Join us

५०० व्हिडीओ, लाखो सबस्क्रायबर्स; BMC चा विद्यार्थी सिल्व्हर प्ले बटनचा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 9:10 AM

‘अंकित गेमर्ज’ यूट्युब चॅनेलवर अंकितने आतापर्यंत ४९४ व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला तब्बल १ हजारापासून ते ९ हजारापर्यंत व्ह्यूज आहेत.

मुंबई : महापालिकेच्या शास्त्रीनगर मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेत दहावीमध्ये शिकत असलेल्या अंकित सिंग याने यूट्युब सबस्क्रायबर्सचा ३ लाखांचा टप्पा पार केला असून, त्याबद्दल त्याला यूट्युबकडून सिल्वर बटनही मिळाले आहे. विशेष म्हणजे गरीब आणि खडतर आर्थिक परिस्थिती असलेल्या अंकितने नववी, दहावीच्या अभ्यासासोबत, यूट्युबचे व्हिडीयो बनवत हा टप्पा अवघ्या २ वर्षांत पार केला आहे. 

कोविड काळात अंकितने विरंगुळा म्हणून यूट्युबवर विविध गेम आणि त्याचे कोडिंग करायला सुरुवात केली. हळूहळू यूट्युबवरील अन्य व्हिडीओ पाहून त्याने ‘अंकित गेमर्ज’ नावाने स्वतःचे यूट्युब चॅनेल सुरू केले. अंकित रोज १ ते २ नवीन व्हिडीओ  यूट्युब चॅनेलवर अपलोड करू लागला. आज अंकितच्या यूट्युब चॅनेलने ३ लाख ४२ हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला आहे. अंकितची ही आवड त्याच्या शाळेत कळल्यावर शास्त्रीनगर महापालिका शाळेचे मुख्याध्यापक स्वप्निल जगताप आणि वर्गशिक्षक इम्रान यांनीही त्याला मार्गदर्शन केले.

‘अंकित गेमर्ज’ यूट्युब चॅनेलवर अंकितने आतापर्यंत ४९४ व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला तब्बल १ हजारापासून ते ९ हजारापर्यंत व्ह्यूज आहेत. यूट्युबवरील सबस्क्रायबर्सची संख्या १ लाखापर्यंत  पोहोचल्यावर यूट्युबकडून क्रिएटरला सिल्वर प्ले बटन प्राप्त होते.

मला माझ्या शिक्षकांचा यात पूर्ण पाठिंबा मिळाला असून आता माझे लक्ष्य १० लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करण्याचे आहे. मात्र येत्या २ मार्चपासून माझी दहावीची परीक्षा असल्याने मी तिथे पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. - अंकित सिंग, पालिका शाळेचा विद्यार्थी

 

टॅग्स :यु ट्यूब