लग्नाच्या 500 पत्रिका वाटल्या; आता कोणत्या शंभरांना बोलविणार?, फोन करून लग्नाला येऊ नका सांगण्याची कुटुंबावर आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 09:05 AM2021-12-29T09:05:14+5:302021-12-29T09:05:37+5:30
Wedding : शासनाने लग्न आणि समारंभांतील उपस्थितीसाठी मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यानुसार, सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये.
मुंबई : ओमायक्रॉनचे संकट आणखी गडद होत असल्याने शासनाने लग्न समारंभांवर निर्बंध घातले आहेत. आयत्यावेळी लागू केलेल्या अटी-शर्तींमुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांची तारांबळ उडाली आहे. आधीच पत्रिका वाटून झाल्याने आता फोन करून लग्नाला येऊ नका, असे सांगण्याची वेळ ओढवली आहे.
शासनाने लग्न आणि समारंभांतील उपस्थितीसाठी मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यानुसार, सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये. खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जी कमी तितकी असेल. या नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. ही नियमावली जाहीर होण्याआधी ज्यांची लग्ने ठरली होती त्यांनी नातेवाईकांसह ओळखीच्यांना पत्रिका वाटल्या. नव्या नियमानुसार त्यातील केवळ १०० लोकांनाच बोलवायचे असल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
जानेवारीतील मुहूर्त
नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात विवाहाचे चार मुहूर्त आहेत. पंचागकर्त्यांच्या म्हणण्यानुसार २२, २३, २४ आणि २५ जानेवारी हे मुहूर्त विवाहास योग्य आहेत. फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि जून महिन्यात या वर्षातील सर्वाधिक मुहूर्त आहेत.
बंदिस्त सभागृहात १०० पेक्षा जास्त नको
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या वाढली. बंदिस्त सभागृहात ३०० ते ७०० माणसांच्या उपस्थितीत लग्ने लागली. परंतु, आता लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये, अशी अट घालण्यात आली आहे.
खुल्या जागेत २५% खुल्या जागेत मंडप थाटून मोठाले लग्नसोहळे आयोजित करण्यावरही आता निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या नियमावलीनुसार, खुल्या जागेत २५० माणसे वा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जी कमी तितकी उपस्थिती असावी. त्याहून अधिक माणसे दिसून आल्यास कारवाई केली जाणार आहे. पुढील आदेशांपर्यंत हा नियम लागू राहणार आहे.
वधू-वर पित्यांना धडकी
आम्ही ५०० हून नातेवाईकांना पत्रिका वाटल्या होत्या. मात्र, आयत्यावेळी निर्बंध लागू केल्याने पंचाईत झाली. दोन्ही पक्षांकडील १०० माणसांनाच परवानगी असल्याने केवळ घरातील माणसांसह लग्न पार पाडावे लागले. इतरांना फोन करून लग्नास येऊ नका, असे सांगावे लागले.
- चंद्रकांत गावडे, वधू पिता
२७ डिसेंबरला माझ्या मुलाचे लग्न झाले. ३०० माणसांसाठी मोठे मंगल कार्यालय बुक केले. पण सारा खर्च वाया गेला. नियमावली जाहीर करताना सर्वसामान्यांचाही विचार केला जावा.
- दिवाकर नाईक, वर पिता