मुंबई : प्लास्टिकचे प्रदूषण कमी व्हावे म्हणून महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. या बंदीला मुंबईकर नागरिकदेखील सकारात्मक प्रतिसाद देत असून, आता ग्राहक बाजारपेठेत गेल्यानंतर स्वत:हून कापडी पिशवी नेतात. दुकानदाराने प्लास्टिक पिशवी देऊ केली तरी नाकारत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे एखाद्या ग्राहकाने पिशवी मागितली तरी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली आहे, असे म्हणत दुकानदारही प्लास्टिक पिशव्या देत नाहीत.
काय येते प्लास्टिकमध्ये
१) प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या).
२) प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणाऱ्या (डिस्पोजेबल) वस्तू जसे की ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, चमचे इत्यादी.
३) हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, द्रव्य पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप / पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टण यांचा समावेश होतो.
किती दंड ?
उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास व २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येईल.
- जून २०१८ ते जानेवारी २०२२ या दरम्यान पावणेदोन लाख किलो प्लास्टिक जप्त.
- प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई, ५ कोटी ३६ लाखांची दंड वसुली.
- प्रतिबंधित प्लास्टिक न वापरण्याचे नागरिकांना सातत्याने आवाहन.
- ‘सिंगल यूज प्लास्टिक’ हे पूर्णपणे प्रतिबंधित.
नागरिकांना त्रास
पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक, वस्तू, कचरा इत्यादी टाकण्यात येत असल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. परिणामी, पाणी तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो.
सवय लावली पाहिजे
ग्राहकांनीच स्वत:ला सवय लावली पाहिजे. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत. कारण सिंगल यूज प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. आपणच सकारात्मक पाऊल उचलले तर निश्चितच पुढील पिढीला याचा फायदा होईल.
- जगन्नाथ गायकवाड, नागरिक