वर्षात ५ हजार मेट्रीक टन कचरा
By Admin | Published: January 18, 2016 02:46 AM2016-01-18T02:46:58+5:302016-01-18T02:46:58+5:30
महापालिकेकडून जैव वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) शास्त्रीय पद्धतीनुसार गोळा करण्यात असून, जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ५ हजार
मुंबई : महापालिकेकडून जैव वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) शास्त्रीय पद्धतीनुसार गोळा करण्यात असून, जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ५ हजार ३७३ मेट्रीक टन एवढ्या जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. महापालिकेने देवनारमध्ये यासाठी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर जैव वैद्यकीय प्रक्रिया केंद्र उभारले असून, येथे दररोज सुमारे १५ मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय आस्थापनांमध्ये गोळा होणारा जैव वैद्यकीय कचरा साधारणपणे १० प्रकारचा असतो. हा कचरा गोळा करणे वैद्यकीय आस्थापनांना बंधनकारक आहे. जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणाऱ्या विविध संस्थांमध्ये रुग्णालये, प्रसूती गृहे, चिकित्सालये, दवाखाने, आरोग्य केंद्रे, जनावरांच्या संस्था, प्राण्यांची रुग्णालये, रोगशास्त्र प्रयोगशाळा, रक्तपेढी आदींचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे खासगी रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा उचलणे व त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी संबंधित वैद्यकीय आस्थापनेची आहे.
सद्य:स्थितीमध्ये जैव वैद्यकीय कचरा गोळा करणे, त्यावर शास्त्रीय पद्धतीनुसार प्रक्रिया करणे ही कार्यवाही एस.एम.एस. इन्होक्लीन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे करण्यात येत आहे. त्यानुसार ९ हजार ८८८ इतक्या वैद्यकीय आस्थापनांकडून हा कचरा गोळा केला जात आहे. जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी चारही बाजूंनी बंद असलेल्या ४९ चार चाकी वाहनांचा वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी चिंचोळ्या रस्त्यांमुळे चार चाकी वाहने जाऊ शकत नाहीत, त्या ठिकाणचा जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी ८ दुचाकी वाहने वापरली जात आहेत. ही सर्व वाहने जीपीएस प्रणालीला जोडलेली असल्याने कोणते वाहन कोणत्या वेळी कुठे आहे, याची खातरजमा करणे शक्य होते, असे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)