राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:12+5:302021-01-13T04:14:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात लवकरच कोरोना प्रतिबंधक लस दाखल होणार असून लसीकरणाची प्रक्रियाही वेगाने सुरू होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात लवकरच कोरोना प्रतिबंधक लस दाखल होणार असून लसीकरणाची प्रक्रियाही वेगाने सुरू होणार आहे. राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात येईल. देशभरात १६ जानेवारी रोजी लसीकरण सुरू होणार असून राज्यातील ५११ केंद्रातील १०० जणांच्या बॅचला लसीचा डाेस देण्यात येईल. राज्यात मुंबईत सर्वाधिक ७२ लसीकरण केंद्र असून पुण्यात ५५ केंद्र आहेत.
राज्यात पुढील दोन महिन्यांत ८ लाख आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. राज्यातील प्रत्येक केंद्रावर १०० आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे सामान्य नागरिकांपुढे आदर्श निर्माण होईल. शिवाय, लसीविषयी गैरसमज, भीतीही निघून जाईल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला. आऱोग्य विभागाचे राज्य लसीकरण अधिकारी डी. एन. पाटील यांनी सांगितले की, लसीच्या डोसची उपलब्धता निश्चित झाल्यानंतर राज्यातील लसीकरण केंद्राची क्षमता हजारांच्या घरात करण्यात येणार आहे, त्यासाठी आराखड्यावर काम सुरू आहे. आतापर्यंत कोविन ॲपवर ७ लाख ८० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
दरम्यान, राज्याचा मृत्युदर सध्या २.५४ टक्के असून उपचाराधीन रुग्णसंख्या ५२ हजार आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून, ही संख्या १४ हजार ७७९ आहे, तर ठाणे व मुंबईत अनुक्रमे १० हजार १४२, ७ हजार ३७० काेराेना रुग्ण उपचाराधीन आहेत.
...............................