चार वर्षांतील आकडेवारी; कोरोना निर्बंधांमुळे २०२० मध्ये दुर्घटनेत २४ टक्के घट
जमीर काझी
मुंबई : राज्यातील रस्त्यावरील अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असताना गतवर्षात मात्र त्यामध्ये पूर्वीच्या तुलनेत तब्बल २४ टक्के घट झाली. अर्थात त्याला प्रमुख कारण हे कोरोनामुळे लागू असलेली संचारबदी आणि निर्बंध होते. गेल्या चार वर्षांत अपघातात एकूण ५० हजार १२९ जणांचा बळी गेला. त्यामध्ये २०२० मधील ११ हजार ५६९ जणांचा समावेश आहे.
राज्यात रस्ते व महामार्गांची संख्या मर्यादित असताना वाहनांचे प्रमाण कित्येक पटीने वाढत आहे. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका वाहतूक कोंडी होऊन अपघातात होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधी राज्यात एकूण एक लाख २९ हजार ६६३ इतके अपघात झाले. त्यामध्ये तब्बल ५० हजार १२९ जण मृत्युमुखी पडले. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत २४ हजार ९७१ अपघात झाले. यात ११ हजार ५६९ जणांना जिवास मुकावे लागले. २०१९ मध्ये अपघात व मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ३२,९२५ व १२,७८८ इतके होते. पूर्वीच्या तुलनेत गेल्या वर्षांतील अपघातांत एकूण २४ टक्के, तर मृत्यू होण्याच्या प्रमाणात १० टक्के घट झाली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे गेल्यावर्षी २३ मार्च ते ऑगस्ट या कालावधीत संचारबदी लागू होती. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध लागू होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी असल्याने आपसूकच अपघाताचे प्रमाणही कमी हाेते.
* चार वर्षांतील राज्यातील अपघात आणि मृत्यूची आकडेवारी
वर्ष अपघात मृत्यू
२०१७ ३६,०५६ १२,५११
२०१८ ३५,७११ १३,२६१
२०१९ ३२,९२५ १२,७८८
२०२० ११,५६९ २४,९७१
एकूण १,२९६६३ ५०,१२९
कोरोना महामारीमुळे कर्फ्यू लागू असल्याने गेल्या वर्षात वाहतुकीचे प्रमाण कमी होते. मात्र, अपघाताचे प्रमाण टाळणे आणि जखमींना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी विविध उपाय राबविले जात असल्याने त्याचे प्रमाण कमी झाले आहे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय (अप्पर महासंचालक, राज्य महामार्ग वाहतूक विभाग)
* उद्याच्या अंकात एनएच ६ बनताेय मृत्यूचा सापळा.
-----------------------------