लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात झाडांची संख्या कमी होत असल्याची ओरड होत असतानाच राखीव वनांना जागा मिळावी, त्यांचे क्षेत्र वाढावे, यासाठी सरकार अत्यंत वेगाने काम करत आहे. शुक्रवारी हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मुंबईच्या उपनगरात राखीव वनासाठी मोठे काम केले आहे.
मुंबईच्या उपनगरातील कुर्ला तालुक्यात राखीव वनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, भांडुप येथे ९४ हेक्टर, कांजूरमार्ग येथे २६४ हेक्टर आणि मुलुंड येथे १४३ हेक्टर क्षेत्र राखीव वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे एकूण ५०२.९५ हेक्टर क्षेत्र राखीव वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणि बांधकामे सुरू आहेत. अशी कामे करताना अनेक वेळा झाडांची हिरवळीची कत्तल केली जाते. आता अशा प्रकारचे क्षेत्र राखीव घोषित करण्यात आल्याने पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल, असा दावा केला जात आहे.