Join us

५०३ कोटींचा पीक विमा १५ दिवसांत जमा होणार; कृषिमंत्र्यांनी दिली विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 5:38 AM

अर्थसंकल्पात जाहीर एक रुपयांत पीक विमा यासाठी विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. 

अर्थसंकल्पात जाहीर एक रुपयांत पीक विमा यासाठी विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार असून या योजनेसाठी ३ हजार ३१२ कोटींची तरतूद केल्याचे सत्तार यांनी सांगितले. पीक विम्याचे ६३ लाख ११ हजार २३५ लाभार्थी आहेत. ५० लाख ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई मिळाली आहे. पावसाने  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे २ हजार ३४२ कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील २ टक्केही खर्च झाले नाही असे म्हणणे बरोबर नाही. पहिल्या टप्प्यात ६५ कोटी ८८ लाख रुपये म्हणजे ८० टक्के पैसे खर्च झाले आहेत. १०८ कोटींचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त असून ३१ मार्चपूर्वी खर्च केला जाईल. त्यातून ५८ कोटी, ४८ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल, असे सत्तार यांनी सांगितले. कृषीमंत्र्यांनी विभागांतर्गत आदेश काढून बदल्या स्थगित केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. बदल्यांना आधीच स्थगिती असल्याने मी स्थगिती देण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.  

‘महानंद’ कामचुकारांना व्हीआरएस द्या : पवार

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री विखे-पाटील यांनी महानंदचे एनडीडीबीमध्ये विलीनीकरण करण्यास अनुमती दिल्याचे सांगत ‘महानंद’च्या काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती द्यावी लागेल असे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वेच्छानिवृत्ती देताना कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रथम निवृत्त करा, अशी मागणी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थसंकल्पीय अधिवेशनअब्दुल सत्तारविधानसभा