मुंबई - दहीहंडी उत्सव जल्लोषात सर्वत्र साजरा होत असताना दही हंडी फोडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या थरांवरून घसरून अथवा पडून आतापर्यंत ५५ गोविंदा जखमी झाले आहेत. या जखमी गोविंदांवर केईएम, नायर, सायन व जे. जे. आदी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५१ जखमी गोविंदांपैकी २७ गोविंदांना उपचार करून सोडण्यात आलं आहे.
मुंबई शहरात अनेक ठिकाणी छोट्या दहीहंड्या लावण्यात आल्या आहेत. या हंड्या फोडण्यासाठी मुंबईबाहेरून तसेच मुंबईतील विविध भागांतून आलेल्या गोविंदा पथकातील ५१ गोविंदा जखमी झाले आहेत. १२ जखमी गोविंदांना पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
काळाचौकीच्या पथकातील १२ वर्षीय विघ्नेश संजय काटकर नामक बालगोविंदाच्या डोक्याला मार लागला आहे. वरळी येथील उदय क्रिडा मंडळमधील २० वर्षीय अनिकेत सुधीर सुतार या गोविंदाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ४१ वर्षीय सुनील प्रभाकर सावंत हे श्री साई देवस्थान गोविंदा पथकातील असून त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पक्षाघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तिघांनाही केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे नायर हॉस्पिटलमध्ये सहा गोविंदांपैकी दोन जखमी गोविंदावर उपचार सुरू असून एकाच्या नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच दुसऱ्या गोविंदाच्या हात व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. या दोन्ही गोविंदावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पालिकेच्या सायन रुग्णालयात चार आणि जे.जे. रुग्णालयात एक गोविंदा जखमी अवस्थेत दाखल झाला आहे. गोवंडी शताब्दी रुग्णालयात २. एम. टी. अगरवाल रुग्णालयात १, राजावाडी रुग्णालयामध्ये १०, कूपर रुग्णालयात ४, ट्रॉमा केअर रुग्णालयात ३, व्ही. एन. देसाई रुग्णालयात १, कांदिवली शताब्दी रुग्णालयात ६ जखमी गोविंदा दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २७ जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे.