धारावी, माहीम, दादरमध्ये एका दिवसात ५१ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:26 AM2020-04-29T05:26:48+5:302020-04-29T05:27:02+5:30
धारावीतील रुग्णांची संख्या ३३० झाली असून १८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : धारावी परिसरात कोरोनाचा धोका वाढत आहे. मंगळवारी तब्बल ४२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाच दिवसात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे धारावीतील रुग्णांची संख्या ३३० झाली असून १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेले तीन दिवस सलग दादर आणि माहीम भागात रुग्ण सापडत नव्हते. मात्र मंगळवारी अनुक्रमे पाच आणि चार नवे रुग्ण सापडले आहेत.
धारावीत दररोज सरासरी २० ते ३० नवीन रुग्ण सापडत आहेत. रविवारी ३४ नवे रुग्ण आढळले होते, तर सोमवारी १३ रुग्ण सापडले आहेत. मात्र मंगळवारी तब्बल ४२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर माहीम मध्ये मंगळवारी पाच नवीन रुग्ण सापडले असून येथील रुग्ण संख्या ३० वर पोहचली आहे. फिशर मन कॉलनी आणि माहीम पोलीस कॉलनीत हे रुग्ण सापडले. दादरमध्ये मंगळवारी चार नवे रुग्ण सापडले. यामुळे येथील रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. पालिका आणि पोलीस वसाहतीत येथे रुग्ण सापडले आहेत.