डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ५१ टक्के काम पूर्ण; 'असा' असेल पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 08:58 AM2023-04-05T08:58:01+5:302023-04-05T08:59:24+5:30
प्रतिकृतीसाठी शिष्टमंडळ गाझियाबादला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला वेग आला आहे. या स्मारकाचे ५१ टक्के काम पूर्ण झाले असून, पुतळ्याच्या २५ फुटी प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी उद्या ६ एप्रिल रोजी लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ गाझियाबादला जाणार आहे. येत्या काही दिवसांतच या प्रतिकृतीला अंतिम स्वरूप प्राप्त होणार असून, त्यानंतर ३५० फूट उंच पुतळ्याच्या कामाला सुरुवात होईल.
डॉ. आंबेडकर यांचे स्मारक २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे.गाझियाबाद येथे ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती साकारली आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड यांच्यासह शिष्टमंडळाने भेट देऊन यात काही बदल सुचवले होते. त्यानुसार तयार झालेल्या प्रतिकृतीची पाहणी शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, आमदार वर्षा गायकवाड, राजेंद्र गवई, सुलेखा कुंभारे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनाही सामाजिक न्याय विभागाकडून निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
असा असेल पुतळा
सध्या असलेल्या पुतळ्याच्या २५ फुटी प्रतिकृतीच्या १५ पट उंचीचा पुतळा प्रत्यक्षात उभारला जाणार असल्याचे सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्राँझ धातूचा हा पुतळा असून तो उभारण्यासाठी चिनी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. चबुतऱ्याची उंची १०० फूट असून त्यावर ३५० फुटांचा पुतळा उभारला जाणार आहे.
लंडनमधील स्मारकाच्याही कामालाही वेग
लंडनमधील किंग हेन्री रोडवरील डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या घरातील स्मारकाच्या कामालाही वेग दिला जाणार आहे. यासाठी एक शिष्टमंडळ एप्रिल महिन्यात लंडनला जाणार आहे. सध्या या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांची पुस्तके असलेले ग्रंथालय उभारण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रसंग दाखविणारी छायाचित्रे तसेच ऑडिओ व्हिज्युअल ग्राफिक्सच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहता येईल असे तंत्रज्ञान या स्मारकात उपलब्ध करण्याचा सामाजिक न्याय विभागाचा प्रयत्न आहे.