Join us

नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात ५१११ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये महानिर्मितीने ५ हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा टप्पा पार करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये महानिर्मितीने ५ हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा टप्पा पार करत महिनाअखेर ५ हजार १११ दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती केली आहे. यामध्ये ४ हजार ५१४ दशलक्ष युनिट औष्णिक वीज केंद्रामधून, १८७ दशलक्ष युनिट वायू वीजनिर्मिती केंद्रामधून, तर ३८८ दशलक्ष युनिट जल विद्युत निर्मिती केंद्राद्वारे आणि २१ दशलक्ष युनिट हे सौरऊर्जा प्रकल्पद्वारे निर्माण करण्यात आली, तर मेगावॅट कोराडी टप्पा ३द्वारे प्रथमच १ हजार २९ दशलक्ष युनिट इतकी विक्रमी वीज निर्मिती करण्यात आली आहे.

महानिर्मितीचे वीज उत्पादन प्रतिदिनी सुमारे ७ हजार मेगावॅटचे आहे. औष्णिक - जल - वायू - सौर क्षमतेनुसार महानिर्मिती १० हजार मेगावॅट वीज उत्पादन करण्यास सज्ज आहे. महानिर्मितीचे बहुतांश औष्णिक संच हे वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या मेरीट ऑर्डर डिस्पॅच प्रणालीनुसार निर्धारित दरात वीजनिर्मिती साध्य करत आहेत. प्रभावी इंधन व्यवस्थापन आणि संचलन कार्यप्रणालीमध्ये सुधारणा साध्य केल्याने औष्णिक वीजनिर्मिती केंद्राद्वारे किफायतशीर दरामध्ये वीजनिर्मिती करणे साध्य झाले आहे.

कोयना व अन्य जलविद्युत केंद्रे नेहमीच जलसंधारण - पाटबंधारे विभागाच्या प्राधान्यक्रम निर्देशानुसार व महावितरणच्या विजेच्या मागणीनुसार चालविण्यात येतात. अल्पसूचनेतही जलविद्युत केंद्रातून सुमारे २,२०० मेगावॅट वीज उत्पादन करण्यास कायम सक्षम आहे, तर वीजनिर्मितीसाठी पाणी उपलब्ध असल्याने त्याचा फायदा येत्या उन्हाळ्यात राज्यातील वीज ग्राहकांना नक्कीच होणार आहे. अमरावती येथील गव्हाणकुंडमध्ये १६ मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या सौर प्रकल्पामधून टप्पाटप्प्याने प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू आहे.