मुंबई : युजीसीने प्रत्येक शैक्षणिक संस्थेला नॅक चा दर्जा असणे अनिवार्य केले असून, मुंबई विद्यापीठाच्या ४५७ महाविद्यालयांपैकी ५२ महाविद्यालयांना नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाला आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. शिवाय हा आकडा पुरेसा नाही, असे म्हणत इतर शैक्षणिक संस्थांनी ‘अ’ दर्जा मिळवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमुद केले.कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने ‘नॅक मूल्यांकन : उच्च शिक्षण संस्थांमध्ये नॅक गुणवत्तेचा प्रभाव’ या विषयावर कोहिनूर बिझनेस स्कूलमध्ये एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाचे उद्घाटन संजय देशमुख यांच्या हस्ते झाले; यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कर्वे, स्कूलचे प्रभारी संचालक डॉ. ए. ए. अत्तरवाला, कांची विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. जयाशंकरन, नॅकचे उपसल्लागार डॉ. बी. एस. मधुकर, कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. मगरे आणि डॉ. मीना चिंतामनेनी उपस्थित होते. सुनिक कर्वे यावेळी म्हणाले की, सर्व शैक्षणिक संस्थांनी इतर शैक्षणिक संस्थांकडे आपला प्रतिस्पर्धी म्हणून पाहू नये. शिक्षण व्यवसाय हे एक पवित्र कार्य आहे आणि ते इतर व्यवसायांहून वेगळे आहे. (प्रतिनिधी)
५२ महाविद्यालयांना नॅकचा ‘अ’ दर्जा
By admin | Published: December 24, 2015 1:54 AM