Join us

५२ वाहनचालकांचे परवाने रद्द

By admin | Published: January 07, 2016 2:21 AM

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर ६ जानेवारीपासून कारवाई करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर ६ जानेवारीपासून कारवाई करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. त्यानुसार, मुंबईत परिवहन विभाग आणि पोलिसांची संयुक्त मोहीम राबवून करण्यात आलेल्या कारवाईत, पहिल्याच दिवशी ५२ जणांचे परवाने रद्द करण्यात आले. मुंबई शहर व उपनगरात वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडले जातात. त्यांच्याविरोधात कारवाई करूनही पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात बुधवारपासून ‘धडक मोहीम’ राबवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. परिवहन विभागांतर्गत आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्ताने मोहीम राबवण्यात आली. पहिल्याच दिवशी वाहतूक नियम मोडणाऱ्या ५१0 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. यात विना हेल्मेट प्रवास केल्याच्या ३५२ केसेस दाखल झाल्या आहेत. त्यानंतर सिग्नल नियम मोडण्याच्या १४0 केसेसची आणि वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्याच्या ९ केसेसची नोंद झाली आहे. सीटबेल्ट न लावणे, भाडे नाकारणे, अवैध प्रवासी, काळ्या काचा न लावण्याऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. एकूण १९0 जणांचे परवाने जप्त करण्यात आले असून, यातील ५२ जणांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले, तर उर्वरित वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)