Join us

५२ लाखांच्या स्क्रीन्स १.७६ कोटीत घेतल्या, शास्त्रज्ञ सीबीआयच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:37 AM

संशोधन संस्थेचा माजी शास्त्रज्ञ डॉ. गुरफान बेग याच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : जाहिरातींच्या डिजिटल बोर्डाची खरेदी करण्यासाठी मुंबईस्थित एका खासगी कंपनीशी संगनमत करून वाढीव किमतीने ते खरेदी केल्याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजी (आयआयटीएम) या सरकारी 

संशोधन संस्थेचा माजी शास्त्रज्ञ डॉ. गुरफान बेग याच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. त्याच्यासोबत संबंधित खासगी कंपनीचा संचालक अनिल गिरकर याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

२०१५-१६ मध्ये अहमदाबाद येथे माहिती देण्यासाठी रस्त्यावर १२ मोठे डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावण्याची निविदा आयआयटीएम संस्थेने जारी केली होती. यासाठी मुंबईतील व्हिडीओ वॉल इंडिया लि. या कंपनीने निविदा भरली होती.

या प्रक्रियेचे काम त्यावेळी आयआयटीएम संस्थेत कार्यरत असलेला डॉ. गुरफान बेग हा शास्त्रज्ञ पाहात होता. त्याने या कंपनीशी संगनमत करून निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्ती शिथिल केल्याचा आरोप सीबीआयने त्याच्यावर ठेवला आहे.

एवढेच नव्हे तर संबंधित कंपनीने चीन येथून या १२ स्क्रीन्स ५२ लाख रुपयांना खरेदी केल्या. मात्र, प्रत्यक्ष संस्थेच्या ताब्यात देताना त्या तब्बल १ कोटी ७६ लाख रुपयांना विकल्याचे तपासात आढळून आले. डॉ. बेग याला याची कल्पना असूनही त्याने ती बिले मंजूर केली. 

दर्जाही सुमारधक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्या स्क्रीनची खरेदी संस्थेने या उद्योजकाकडून केली आहे, त्यांची गुणवत्ता अतिशय सुमार असल्याचेही दिसून आले. तसेच या स्क्रीनचे पॅनल व अन्य तांत्रिकावर सीमा शुल्क आकारणी होऊ नये, याकरिता चीन येथून आयात करताना त्याची बनावट नोंद देखील संबंधित कंपनीने केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

टॅग्स :गुन्हा अन्वेषण विभाग