Join us

५२ टक्के विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे कल, अकरावीसाठी २.३८ लाख विद्यार्थी प्रवेशोच्छुक

By रेश्मा शिवडेकर | Published: June 18, 2024 9:36 PM

१.६० जागा आतापासूनच रिक्त

मुंबई- मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाकरिता यंदा एकूण २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशेच्छुक विद्यार्थांच्या संख्येत २३,१८१ भर पडली आहे. मात्र उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधीच तब्बल १.६० लाख जागा रिक्त राहणार असल्याचे दिसून येत आहे.

यंदा तब्बल ३.९९ लाख जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तुलनेत केवळ २.३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे १.६० लाखांच्या आसपास जागा रिक्त राहणार आहेत. इतक्या जागा रिक्त राहूनही दरवर्षी अकरावीकरिता नव्या तुकड्यांना मान्यता दिली जात आहे.

प्रवेशाकरिता नोंदणी कऱणाऱया विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५२ टक्के विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखेला पसंती दिली आहे. कॉमर्स खालोखाल ३९ टक्के विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा आहे. तर अवघ्या ९ टक्के विद्यार्थ्यांना कला शाखेला पसंती दिली आहे.

यात १०० टक्के मिळालेल्या ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ९९ ते ९९.९९ टक्के मिळविणारे ५४ आणि ९५ ते ९८.९९ टक्के मिळविणारे ३,७१५ विद्यार्थी आहेत.

एमएमआरची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी १५ जूनपर्यंत आपल्या प्रवेशाचा भाग २ पूर्ण भरला आहे, त्यांना ती ऑनलाईन तपासता येईल. या यादीचा उपयोग आपली प्रवेशाची स्थिती तपासण्याकरिता होता. यादीबाबत काही तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना २१ जूनपर्यंत ती ऑनलाईन ग्रीव्हन्स टुलमध्ये नोंदविता येईल.

एमएमआरमधील अकरावीचे प्रवेशेच्छुक विद्यार्थी

२०२४ - २,३८,९३४

२०२३ - २,१५,७५३

….

उपलब्ध जागा

२०२४ - ३,९९,२३५

२०२३ - ३,७९,१५५

….

शाखानिहाय प्रवेशेच्छुक विद्यार्थी

कला  - २०,४२९

कॉमर्स - १,२३,७७४

विज्ञान - ९३,८९५

एचएसव्हीसी - ८३६

एकूण -  २,३८,९३४

….

शाखानिहाय उपलब्ध जागा

आर्ट्स - ५२,३१०

कॉमर्स - २,०८,५२०

सायन्स - १,३३,४४०

एचएसव्हीसी - ४,९६५

एकूण - ३,९९,२३५

….

टक्केवारीनुसार विद्यार्थी

१०० - ९

९९ ते ९९.९९ - ५४

९५ ते ९८.९९ - ३,७१५

९० ते ९५.९९ - १४,०३४

८० ते ८९.९९ - ४७,२६४

६० ते ७९.९९ - १,१२,८७३

५९.९९ पेक्षा कमी - ६०,९८५

टॅग्स :शिक्षणमहाविद्यालय