मध्य रेल्वेवर ५२२ कोटींचा भार
By admin | Published: June 11, 2015 05:56 AM2015-06-11T05:56:52+5:302015-06-11T05:56:52+5:30
मध्य रेल्वे मार्गावर डीसी-एसी परावर्तन नुकतेच पूर्ण झाले. या परावर्तनामुळे गाड्यांचा वेग वाढण्याबरोबरच वीजेचीही बचत होणार असली तरी या परावर्तनामुळे
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर डीसी-एसी परावर्तन नुकतेच पूर्ण झाले. या परावर्तनामुळे गाड्यांचा वेग वाढण्याबरोबरच वीजेचीही बचत होणार असली तरी या परावर्तनामुळे मध्य रेल्वेवर ५२२ कोटी रुपयांचा अधिक भार पडल्याचे समोर आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावर ८ जून रोजी डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५ हजार व्होल्ट अल्टरनेट करंट) परावर्तन पूर्ण करण्यात आले. सीएसटी ते मुंब्रा धीम्या मार्गावर आणि एलटीटी ते ठाणे पाचवा-सहाव्या मार्गावर हे परावर्तन पूर्ण करण्यात आले. या परावर्तनामुळे सध्या लोकलचा असलेला ताशी ८0 किमी वेग हा ताशी १00 किमी एवढा होईल. तर दर वर्षी वीजेचा सर्वाधिक वापर होत असल्याने वीज बचत होत नव्हती आणि वीजेचा खर्चही अधिक होत होता. आता या परावर्तनामुळे वीज बचत होणार असून तब्बल वर्षाला ११४ कोटी रुपये वीजेमुळे होणारा तोटा वाचणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
मात्र रेल्वेला एकीकडे हा फायदा जरी होत असला तरी दुसरीकडे रेल्वेला या प्रकल्पासाठी खर्चाचा अधिक भारही सोसावा लागला आहे. १९९६-९७ मध्ये प्रकल्पासाठी ६५४ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रकल्पासाठी एकूण १ हजार १७६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. हे पाहता तब्बल ५२२ कोटी रुपयांचा अधिक भार पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा भार वीज बचतीच्या स्वरुपात भरुन निघेल, अशी आशा मध्य रेल्वेला आहे.
याआधी मध्य रेल्वे मार्गावर वसई-दिवा-जसई, पनवेल-कर्जत, इगतपुरी-कल्याण आणि पुणे-कल्याण, कल्याण ते ठाणे जलद मार्ग, ठाणे ते एलटीटी पाचवा आणि सहावा मार्गावर काम पूर्ण करण्यात आले आहे.