लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये ५२ हजार २२१ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी एक लाख ४५ हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना सद्यःस्थितीत फक्त एक लाख कर्मचारी कामाचा अतिरिक्त ताण सहन करून कर्तव्य पार पाडत आहेत. महापालिकेतून २०२४-२५ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार असून रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याशिवाय ही पदे भरण्यावर असलेल्या बंदीचीही चौकशी करावी, असा सूर जोर धरू लागला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील सुमारे सव्वा कोटी लोकांना नागरी सेवा पुरविण्याचे काम महानगरपालिका अहोरात्र करत असते. त्यासाठी १२९ विविध खाती विभाग कार्यान्वित आहेत. त्यातील काही खाती किंवा विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात. नागरी सेवा पुरविण्यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची १,४५,१११ इतकी संभाव्य पदे निर्माण केली होती. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरविण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती आणि काही विभाग महापालिकेने सुरू केले आहेत. मात्र, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ नव्याने भरती केले नाही. इतकेच नाही तर सेवानिवृत्ती, कर्मचाऱ्याचा मृत्यू आदी कारणांमुळे रिक्त झालेली पदे गेली अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे सुमारे ५२ हजार २२१ पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
पालिकेची दमछाक आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून पुढील २० वर्षांत ती १ कोटी ७५ लाख होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देताना कर्मचाऱ्यांअभावी पालिकेची दमछाक होणार आहे.
दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्धकरून देणाऱ्या मुंबई महापालिकेतच हजारो पदे रिक्त ही पालिकेसाठी अभिमानाची गोष्ट नाही. कायमस्वरूपी कामगार भरती न करता कंत्राटी पद्धतीचा मार्ग पालिकेने अवलंबला आहे. कर्मचाऱ्यांअभावी उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून भविष्यात पालिकेत कंत्राटी कामगारांचे राज्य असेल. त्यामुळे या बंदीची कारणे समोर यावीत आणि त्याची चौकशी व्हावी. - गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन