- अजय परचुरे मुंबई : वांद्रे पूर्वमधील प्रख्यात एमआयजी क्लबला म्हाडाने दणका दिला आहे. एमआयजी क्लबने म्हाडाशी झालेल्या भूखंडाच्या भाडेतत्वाच्या कराराचा भंग केला आहे. करारानुसार विनामूल्य शाळा बांधून न देणाऱ्या एमआयजी क्लबला म्हाडाने गुरुवारी ५३ कोटींचा दंड ठोठावला. लवकरच क्लबला नोटीस पाठवून दंड वसूल करण्यात येणार असल्याचे म्हाडा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.म्हाडाने काही वर्षांपूर्वी एमआयजी येथील भूखंड एमआयजी क्लबला भाडतत्त्वावर दिला होता. या भूखंडाला लागून नवजीवन शिक्षण संस्थेची अभिनव विद्यालय ही शाळा होती. भूखंडावर शाळेचे आरक्षण असल्याने म्हाडा आणि एमआयजीमध्ये झालेल्या करारानुसार एमआयजी क्लबने नवजीवन शिक्षण संस्थेला विनामूल्य शाळेची इमारत बांधून देणे बंधनकारक होते. मात्र, एमआयजी क्लबने नवजीवन संस्थेच्या शाळेची इमारत पाडत, तेथे भलेमोठे मैदान आणि एमआयजी क्लबची इमारत उभारली. या क्लबमध्ये क्रिकेटपटू, खेळाडू आणि राजकारण्यांची ये-जा असते. एमआयजी क्लबची ओळख एक नामांकित क्लब म्हणून निर्माण झाली. मात्र, एमआयजी क्लबला शाळा बांधून देण्याचा विसर पडला.दरम्यान, शाळेला जागा नसल्याने काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या शाळेत नवजीवन शिक्षण संस्थेची शाळा हलविण्यात आली आहे, तर पालिकेची शाळा समोरच्या गांधीनगर म्हाडा वसाहतीतील इमारतीत हलविण्यात आली. शाळा बांधून द्यावी, यासाठी नवजीवन शिक्षण संस्थेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.या प्रकरणाची म्हाडा प्राधिकरणाने गंभीर दखल घेत चौकशी केली. चौकशीत एमआयजी क्लबने कराराचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगत म्हाडाने त्यांना ५३ कोटींचा दंड ठोठावला आहे. गुरुवारी झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. लवकरच दंडाची रक्कम वसूल करून त्यातून शाळा बांधण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.‘अडचणींमुळे थांबविले काम’म्हाडाकडून अद्याप नोटीस वा पत्र आलेले नाही. अधिकृत कागदपत्रे मिळाल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल, असे एमआयजी क्लबचे अध्यक्ष संजीव पत्की यांनी सांगितले. आम्ही शाळा बांधण्याच्या कामाला कधीच सुरुवात केली होती. मात्र, काही अडचणींमुळे हे काम थांबल्याचेही पत्की यांनी बोलताना सांगितले.
वांद्रेतील एमआयजी क्लबला म्हाडाकडून ५३ कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:03 AM