मोबाइल क्रमांक पोर्टेबिलिटीसाठी सप्टेंबरमध्ये ५३ लाख अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 08:15 AM2019-11-25T08:15:52+5:302019-11-25T08:16:10+5:30
मोबाइल क्रमांक पोर्टेबिलिटीसाठी (एमएनपी) सप्टेंबर महिन्यात ५३ लाख ९ हजार ग्राहकांनी अर्ज केले होते.
मुंबई : मोबाइल क्रमांक पोर्टेबिलिटीसाठी (एमएनपी) सप्टेंबर महिन्यात ५३ लाख ९ हजार ग्राहकांनी अर्ज केले होते. आॅगस्टपर्यंत एमएनपीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांची संख्या ४५ कोटी २२ लाख होती. त्यामध्ये भर पडून सप्टेंबर महिन्यात ही संख्या ४५ कोटी ७६ लाख झाली आहे.
एमएनपीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत सर्वाधिक अर्ज कर्नाटक राज्यातून करण्यात आले आहेत. ४ कोटी २० लाख जणांनी आतापर्यंत यासाठी अर्ज केले आहेत. सर्वात कमी अर्ज जम्मू-काश्मीरमधून अवघ्या ११ लाख जणांनी केले आहेत.
महाराष्ट्रातील ३ कोटी ४३ लाख ग्राहकांनी, तर मुंबईतील २ कोटी ३१ लाख ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दूरसंचार नियामक आयोगाने याबाबत अहवालामध्ये माहिती दिली आहे.
दूरसंचार घनतेमध्ये देशाची सरासरी घनता ९०.५२ टक्के आहे. दिल्लीचा प्रथम क्रमांक असून २४२ टक्के घनता आहे. तर त्याखालोखाल हिमाचल प्रदेशमध्ये १४९ टक्के घनता आहे. सर्वात कमी घनता बिहारमध्ये ५९.७२ टक्के आहे. महाराष्ट्रातील दूरसंचार घनता १०७.६४ टक्के आहे. याशिवाय गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब व केरळ या राज्यांमध्ये घनता १०० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आंध्र प्रदेश व हरयाणामध्ये ९८ टक्क्यांपेक्षा जास्त घनता आहे. देशाच्या सरासरी घनतेपेक्षा जास्त घनता ९ राज्यांमध्ये आहे.