मुंबई विमानतळावरील प्रवासी 53 हजारांवर; वीकेंडला प्रवासाला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:38 AM2021-10-18T08:38:50+5:302021-10-18T08:39:00+5:30

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात मुंबई विमानतळावरून चार लाख आठ हजार जणांनी देशांतर्गत प्रवास केला हाेता. हीच संंख्या १ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाच लाख सहा हजारांच्या घरात पाेहाेचली.

53 thousand passengers at Mumbai airport | मुंबई विमानतळावरील प्रवासी 53 हजारांवर; वीकेंडला प्रवासाला मागणी

मुंबई विमानतळावरील प्रवासी 53 हजारांवर; वीकेंडला प्रवासाला मागणी

Next

मुंबई : कोरोनाबाबतच्या निर्बंधात शिथिलता मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावरील दैनंदिन प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चालू महिन्यात सरासरी ५३ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. दोन डोस घेतलेल्यांना कोरोना चाचणीतून मिळालेली मुभा आणि विमानांची प्रवासी क्षमता वाढवल्याचा हा परिणाम असल्याचे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे. 

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात मुंबई विमानतळावरून चार लाख आठ हजार जणांनी देशांतर्गत प्रवास केला हाेता. हीच संंख्या १ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाच लाख सहा हजारांच्या घरात पाेहाेचली. त्यामुळे महिनाभरात प्रवासी संख्येत १७ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी देशांतर्गत विमान प्रवासाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

ऑक्टोबरमध्ये वीकेंड प्रवाशांची दैनंदिन संख्या सरासरी ५९ हजार इतकी नोंदविण्यात आली. सप्टेंबरच्या तुलनेत वीकेंड प्रवाशांत सात टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावरील उड्डाण संख्येतही वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये देशांतर्गत उड्डाण संख्या ३ हजार ८०० हाेती, तर ऑक्टोबरमध्ये ती ४ हजार ४०० वर पोहोचली. 

गोपाळकाल्यापासून प्रवासी वाढले. गणपती आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याने उच्चांक गाठला. सप्टेंबरमध्ये इंडिगो, एअर इंडिया आणि विस्तारा या कंपन्यांनी प्रवाशांचा सर्वाधिक भार वाहिला. तर ऑक्टोबरमध्ये इंडिगो, गाे फस्ट आणि एअर इंडियाच्या विमानांना प्रतिसाद दिसून आला.

मुंबईतील वीकेंड प्रवासी (दैनंदिन)
कालावधी    आगमन    प्रस्थान    एकूण
१ ते १० सप्टेंबर    २५,२८०    २५,४४३    ५०,७२३
१ ते १० ऑक्टोबर    २८,७८२    ३०,५८५    ५९,३६७
वीकडेजचे प्रवासी (दैनंदिन)
कालावधी    आगमन    प्रस्थान    एकूण
१ ते १० सप्टेंबर    २३,९६०    २३,२९१    ४७,२५१
१ ते १० ऑक्टोबर    २६,१०३    २६,९८४    ५३,०८६

जुहू विमानतळावरून ८७ विमानांची ये-जा
जुहू विमानतळावरून शनिवारी ८७ विमानांनी ये-जा केली. त्यात चार्टर विमानांसह, हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षणार्थी विमानांचा समावेश होता. देशातील विविध विमानतळांवरून ४४ विमानांद्वारे १३० प्रवासी जुहूत दाखल झाले. तर ४३ विमानांनी येथून उड्डाण घेत १३३ प्रवाशांना सेवा दिली. याकाळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याची माहिती जुहू विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: 53 thousand passengers at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.