५३ वर्षीय महिलेने दिले चार जणांना जीवनदान, मुंबईत या वर्षातील दुसरे अवयवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:19 AM2020-01-21T03:19:43+5:302020-01-21T03:21:03+5:30
राज्यात सर्वाधिक मरणोत्तर अवयवदान मुंबईत झाले असून गेल्या वर्षात ७९ दात्यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : नव्या वर्षातील मुंबईतील दुसरे अवयवदान अंधेरी येथील खासगी रुग्णालयात रविवारी पार पडले. ५३ वर्षीय महिलेने हृदय, फुप्फुस, दोन्ही मूत्रपिंडे दान केली. यामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळाल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली. गेल्या वर्षभरात शहर, उपनगरात ७९ अवयवदान यशस्वीरीत्या पार पडले. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या अवयवदानांची संख्या लक्षणीय आहे.
राज्यात सर्वाधिक मरणोत्तर अवयवदान मुंबईत झाले असून गेल्या वर्षात ७९ दात्यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण २८७ दात्यांनी अवयवदान केले आहे. २०१५ साली १०९ अवयव प्रत्यारोपित केले होते. दरवर्षी यामध्ये वाढ होऊन गेल्या वर्षभरात प्रत्यारोपित केलेल्या अवयवांची संख्या २२२ वर गेली आहे. पाच वर्षांमध्ये हृदय प्रत्यारोपणाच्या संख्येत नोंद घेण्याइतपत वाढ झाली असून तीनवरून हे प्रमाण गेल्या वर्षी थेट २१ वर पोहोचले आहे. फुप्फुसाच्या प्रत्यारोपणामध्ये शून्यावरून दहापर्यंत शहराने प्रगती केली आहे. मूत्रपिंडांचे सर्वाधिक प्रत्यारोपण झाले आहे.