Join us  

मनोरीच्या आपदग्रस्त मच्छिमारांना मुख्यमंत्री निधीतून ५४ लाखांची  मदत जाहीर

By मनोहर कुंभेजकर | Published: February 22, 2023 6:51 PM

लोकमत इम्पॅक्ट: मनोरीच्या आपदग्रस्त मच्छिमारांना मुख्यमंत्री निधीतून ५४ लाखांची मदत जाहीर झाली आहे.

मुंबई: बोरिवली विधानसभा क्षेत्रातील मालाड पश्चिम मनोरी येथे दि,१९ फेब्रुवारी रोजी लागलेल्या भीषण आगीत येथील दहा मच्छिमारांच्या सुमारे ९७ 'डोल आणि भोक्सी या प्रकारच्या जाळ्या आणि त्यांच्या सहा शेड्स भस्मसात झाल्या. यामुळे येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या.तहसीलदारांनी केलेल्या पंचनामा नुसार रुपये ५४.०० लाखांचे आर्थिक नुकसान झाले होते.याबाबत सर्वप्रथम कालच्या लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध करून शासनाचे लक्ष वेधले होते.

बोरिवलीचे स्थानिक भाजपा आमदार सुनिल राणे यांनी याबाबत त्वरित  पाठपुरावा करून सरकारी यंत्रणा कार्यन्वित केल्या.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्याशी संपर्क साधला.तसेच येथील मच्छिमारांची रोजी रोटी सुरू होण्यासाठी त्यांनी स्वतः पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

काल संध्याकाळी झालेल्या ससून डाॅक येथील कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री व आमदार सुनील राणे यांनी मनोरीच्या आपदग्रस्त मच्छिमारांना मुख्यमंत्री साहय्यता निधीतून ५४ लाखांची मदत करण्याची विनंती केली होती. आणि मुख्यमंत्र्यांनी  त्वरित मुख्यमंत्री निधीतून ५४.०० लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली.

याबाबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले की, काल वेसावे बंदरावर झालेल्या सागर परिक्रमा यात्रा २०२३च्या कार्यक्रमात केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला  व केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डाॅ. भागवत कराड प्रमुख उपस्थित होते. सदर बाब मच्छिमार बांधवांच्या वतिने आपण महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या वतीने  उपस्थित केला होता.आणि सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधी मधून ५४.०० लाख रुपये मदत देण्याची घोषणा करून मनोरीकरांना मोठा  दिलासा दिला. त्याबद्धल त्यांनी समितीच्या वतीने मुख्यमंत्री, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार सुनील राणे यांचे आभार मानले.

 

टॅग्स :मुंबईमच्छीमार