मुंबई - पोयसर नदी रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ५४ झोपडीधारकांना मोठ्या संघर्षातून हक्काचे घर मिळणार आहे. हा तर बाधित होणाऱ्या झोपडीधारकांसाठी सोनेरी दिवस आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व कांदिवली पूर्वचे स्थानिक आमदारअतुल भातखळकर यांनी केले. या बाधित झोपडीधारकांना बाणडोंगरी येथे मिळालेल्या सदनिकांच्या चावी वाटप समारंभात ते बोलत होते. हनुमाननगर येथील स्वयंभू शंकर मंदिर परिसरात या सदनिकांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बाधित झोपडीधारक आणि पोयसर, हनुमाननगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. भातखळकर म्हणाले, या बाधित झोपडीधारकांसाठी आपण मोठा संघर्ष केला. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने येथील विस्थापितांना माहुलला आणि माहूलच्या विस्थापितांना येथे घरे देण्याचा उलटा निर्णय घेतला होता. तो हाणून पाडत बाधित झोपडीधारकांना या परिसरातच घरे मिळाली पाहिजेत, या उद्देशाने केलेल्या आंदोलनाचे हे फलित आहे. यातून ५४ सदनिका ‘एसआरए’मधून आपण मिळवल्या. येणाऱ्या काळात आप्पापाडा येथे ६०० सदनिका तयार होत आहेत. या सदनिकाही पोयसर आणि हनुमाननगर येथील नदीच्या रुंदीकरणात जे विस्थापित होत आहेत, त्यांच्यासाठीच आरक्षित केल्या असल्याचे ते म्हणाले.
यावेळी झोपडीधारकांना आ. भातखळकर यांच्या प्रयत्नातून हक्काचे घर मिळाल्याबद्दल रहिवाशांनी त्यांचा नागरी सत्कार केला. यावेळी उत्तर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष सुधीर शिंदे, वॉर्ड अध्यक्ष शिवशंकर प्रजापती, महापालिकेचे अधिकारी यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.