मुंबई : पंतप्रधान उच्चशिक्षण अभियानाअंतर्गत (पीए उषा) महाराष्ट्रातील ११ विद्यापीठांसह विविध उच्चशिक्षण संस्थांना पायाभूत व शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी ५४० कोटींचा निधी मिळणार आहे.
राज्यातील एसएनडीटी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ यांना प्रत्येकी १०० कोटी, तर उर्वरित विद्यापीठांना प्रत्येकी २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. यात मुंबई होमी भाभा राज्य विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांना प्रत्येकी २० कोटी मिळणार आहेत.
आयआयटीतील रिसर्च पार्कचे उद्घाटन
आयआयटी मुंबईच्या पवई येथील प्रांगणात बांधल्या जाणाऱ्या रिसर्च पार्क इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. २२५ कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीकरिता केंद्रीय शिक्षण विभागाने १०० कोटी दिले होते.
देशभरात ३७ शिक्षण संस्थांना, ४४ शाळा आणि दोन कौशल्य शिक्षण संस्था मिळून १३,३७५ कोटींचा निधी पीएम-उषाअंतर्गत (आधीचा रुसा) मंजूर झाला आहे. मंगळवारी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पांची घोषणा केली. जम्मूमध्ये प्रत्यक्ष झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील अनेक प्रकल्पांना हिरवा कंदिल दाखवला. विद्यापीठांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये ३२ हजार कोटींचे प्रकल्प
आयआयटी भिलई, आयआयटी तिरुपती, आयसर तिरुपती, आयआयआयटीडीएम कुरनूलची घोषणा
बोधगया, जम्मू, विशाखापट्टणम येथे आयआयएमए होणार
कानपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्सची घोषणा
जम्मू एम्सचे उद्घाटन