नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये वर्षभरामध्ये ५४०५ गुन्हे दाखल झाले असून त्यामधील ३६२६ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडी, फसवणूक व महिलांविषयी गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. सोनसाखळी व वाहनचोरीच्या घटना कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या वर्षभरामधील कामगिरीची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. वर्षभरातील कामगिरीविषयी आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत असून येथील गुन्ह्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे.गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. पूर्वी मारामारी, चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत होते. आता फसवणूक, अपघात व महिलांशी संबंधित गुन्हे वाढत आहेत. गतवर्षी शहरामध्ये ५२८८ गुन्हे दाखल झाले होते. यावर्षी त्यामध्ये ११७ गुन्हे वाढले आहेत. गुन्ह्यांचे हे प्रमाण वाढले असले तरी त्यामुळे गुन्हेगारी वाढली असे म्हणता येणार नाही. यावर्षी अल्पवयीन मुले हरविल्याची प्रत्येक घटना अपहरण म्हणून नोंदविण्यास सुरवात झाली. यामुळे १२५ गुन्हे वाढले आहेत. २०१५ हे वर्ष पोलिसांसाठी दिलासा देणारेच ठरले आहे. मागील काही वर्षामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत होती. गतवर्षी तब्बल २९७ घटना घडल्या होत्या. यावर्षी १०१ गुन्हे कमी झाले आहेत. पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला मोक्का लावल्यामुळेच या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता आले आहे. वाहन चोरीचे गुन्हेही कमी झाले आहेत. फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गतवर्षीपेक्षा ८७ गुन्हे वाढले आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. महिलांवरील अत्याचारामध्येही वाढ होवू लागली आहे. वर्षभरामध्ये बलात्काराचे १०४ गुन्हे दाखल झाले आहेत. विनयभंगाच्या २०२ घटना घडल्या आहेत. वाढते अपघात थांबविण्याचेही आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. वर्षभरामध्ये ६०४ अपघात झाले आहेत. यामधील ३६७ घटनांमध्ये अपघातग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, पोलीस उपआयुक्त दिलीप जगताप, शहाजी उमाप, सुरेश मेंगडे, विश्वास पांढरे, अरविंद साळवे, प्रशांत खैरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)फसवणुकीच्या घटना चिंताजनकपोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. वर्षभरामध्ये ५६३ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. काही गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या ५० ते १०० च्या घरामध्येही आहे. शहरात रोज एकपेक्षा जास्त फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. परिमंडळ दोन परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. स्वस्त घर देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक होत असून या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहरात अपघातांचे प्रमाणही प्रचंड वाढत आहे. गतवर्षी ६०४ अपघात झाले आहेत. गतवर्षीपेक्षा ८८ अपघात जास्त झाले आहेत. यामधील ३६७ अपघातामध्ये अपघातग्रस्तांना जीव गमवावा लागला आहे. सायन - पनवेल महामार्ग, जुना मुंबई पुणे महामार्ग, पामबीच रोडवरही अपघात वाढले आहेत. वेगाने वाहने चालविल्यामुळे व इतर नियमांचेही उल्लंघन केल्याने या घटना वाढत आहेत. शहरात रोज किमान एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू होत आहे.
वर्षभरामध्ये ५४०५ गुन्हे दाखल
By admin | Published: January 08, 2016 2:18 AM