Join us

मुंबई शहरात ५४२ अतिधोकादायक इमारती

By admin | Published: May 22, 2015 1:15 AM

म्हाडाने मुंबईतील १४ इमारती अतिधोकादायक घोषित केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेनेही अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे.

मुंबई : म्हाडाने मुंबईतील १४ इमारती अतिधोकादायक घोषित केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेनेही अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची संख्या ५४२ असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. ‘एल’ विभाग/कुर्ला येथे सर्वाधिक म्हणजे ११६ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या इमारतींच्या सर्वेक्षणानंतर म्हाडाने गेल्या आठवड्यातील शनिवारी मुंबईतील १४ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतीमधील ५३७ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याचे काम म्हाडातर्फे हाती घेण्यात येणार आहे.आता बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४ च्या तरतुदीन्वये मुंबई महापालिका क्षेत्रातील ५४२ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्या इमारतींमध्ये खासगी, महापालिका, म्हाडा व शासकीय इमारतींचा समावेश आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या या यादींमध्ये सर्वाधिक ११६ इमारती या ‘एल’ विभागात असून सर्वांत कमी म्हणजेच एक इमारत ‘सी’ विभागात आहे. या इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्याकरिता महापालिकेकडून वेळोवेळी कळविण्यात आले आहे. तथापि, काही इमारतींमध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत. या इमारतीतील नागरिकांनी त्यांच्या इमारतींचा ताबा त्वरित सोडावा, असे पालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.या अतिधोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी ही त्या इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या संबंधित नागरिकांची राहील. त्याकरिता महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.