Join us

मेट्रो ४ आणि ४ अ साठी ५४५ दशलक्ष युरोचे कर्ज , कमी व्याजदराने देण्यात आली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 3:45 AM

Metro : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या दोन्ही मेट्रोंची कामे सुरू आहेत.

मुंबई : वडाळा ते कासारवडवली (मेट्रो-४) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो-४ अ) करिता वित्तपुरवठा करण्यासाठी जर्मनीच्या आर्थिक सहकार आणि विकास मंत्रालयाने केंद्रीय वित्त मंत्रालयाला ५४५ दशलक्ष युरोची दोन कर्जे मंजूर केली आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या दोन्ही मेट्रोंची कामे सुरू आहेत. ५४५ दशलक्ष युरो कर्जाची रक्कम ही यापूर्वी कोणत्याही वित्तीय संस्थेमार्फत भारताला देण्यात आलेल्या रकमेत सर्वाधिक असून तीसुद्धा कमी व्याजदराने देण्यात आलेली रक्कम आहे, असा दावा प्राधिकरणाने केला आहे. आता या दोन्ही मेट्रोंच्या कामांस आणखी वेग येणार असून, मेट्रो धावू लागल्यानंतर लाखो प्रवाशांचा त्रास कमी होईल.मुंबई मेट्रो ४ व ४ अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली.

अशी असेल कर्जविभागणी- ३४५ दशलक्ष युरोचे विकास कर्ज- २०० दशलक्ष युरोचे प्रोत्साहन कर्ज- मंजूर ३४५ पैकी २५५ रोलिंग स्टॉक खरेदी आणि एकात्मिक तिकीट प्रणालीसाठी- ९० दशलक्ष मल्टीमोडल इंटिग्रेशन सिस्टीमसाठी- ३४५ दशलक्ष युरोचा व्याजदर ०.२९ टक्के आणि ०.०७ टक्के- २०० दशलक्ष युरोचा व्याजदर ०.८२ टक्के

मेट्रो ४ आणि ४ अ वेळेवर पूर्ण होईल. कामे सुरू असलेल्या व नियोजित असलेल्या मेट्रो प्रकल्पांसाठी निधीचा अभाव भासणार नाही.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मेट्रो ४ आणि ४ अ सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे १ लाख २१ हजार टन ग्रीनहाउस गॅसची बचत होण्यास मदत होईल. त्यामुळे वायुप्रदूषण कमी होईल.- आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

टॅग्स :मुंबईमेट्रो