Join us

गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या ५४६ कामगारांची अखेर घरवापसी; ४ लाख ८१ हजार मजूर मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:43 AM

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत. जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत.

मुंबई : कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मेट्रो प्रकल्पातील बहुसंख्य कामगारांनी आपले मूळ गाव गाठले होते. याचा परिणाम मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावर झाला होता. मात्र आता अनलॉकनंतर मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. मेट्रो-४, मेट्रो-४ अ आणि मेट्रो-७ प्रकल्पासाठी काम करत असलेले शेकडो कामगार परतत असून, आणखी कामगार परतण्याच्या मार्गावर आहेत, असाही दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई मेट्रो लाइन ४ आणि ४ अ साठी काम करत असलेल्या कामगारांपैकी अनेक कामगार आता परत येऊ लागले आहेत. यातील बहुतांश कामगार हे कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश येथील मूळ गावी गेले होते. आता परत येत असलेल्या कामगारांमध्ये अकुशल कामगार ३२८, कुशल कामगार २१८ असे एकूण ५४६ कामगार परत आले आहेत. येत्या आठवड्यात बिहार आणि पश्चिम बंगाल येथून आणखी कामगार परत येतील, असा आशावाद प्राधिकरणाने वर्तविला आहे. आठवडाभरात परतणाऱ्या कामगारांची संख्या २२८ असेल. मेट्रो लाइन ७ चा विचार करता महाराष्ट्रात मूळ गावी गेलेले ३८६ कामगार परत आले आहेत. तर महाराष्ट्राबाहेर आपल्या मूळ गावी गेलेले ११५ कामगार परत आले आहेत. जुलै महिन्यात महाराष्ट्रातून १७५ कामगार परत येतील तर राज्याबाहेरून ७५५ कामगार परत येतील, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, भुयारी मेट्रो-३ चा विचार करता यासाठी येथे एकूण १५ हजार कामगार काम करत आहेत. मात्र कोरोनामुळे यापैकी अनेक कामगार आपल्या मूळ गावी गेले आहेत. परिणामी ४ हजार कामगार काम करत आहेत. तर महिन्याला १ लाख मेट्रिक टन उत्खनन केले जात होते. हे प्रमाण ४३ हजार झाले आहे. महिन्याला १ हजार ५०० मीटर बोगदा खणला जात होता. ते प्रमाण आता ३३० मीटरवर आले आहे. स्लॅबच्या कामाचा विचार करता हे काम १६ हजार चौरस मीटरवरून ४ हजार ७०० वर आले आहे. एकूण काम ६ महिने पाठी गेले आहे. राज्य शासनाच्या नियमांचे पालन करत एमएमआरडीएने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी पुन्हा मजूर भरतीसाठी विविध माध्यमांच्या आधारे जाहिराती दिल्या. या जाहिरातींना सध्या मजूरवर्गांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.लवकरच आणखी २८२ कामगार परतणारमहाराष्ट्र व बिहार, गुजरात, पश्चिम बंगालमधील ११ कुशल व निमकुशल कामगार मेट्रो ६ (जोगेश्वरी-विक्रोळी) च्या कामासाठी परत आले.मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) आणि ४ अ - (कासारवडवली ते गायमुख) च्या कामासाठी ५४६ कामगार परत आलेले आहेत.या दोन मेट्रो प्रकल्पांसाठी आणखी २८२ कामगार येत्या काही दिवसांत बिहार आणि पश्चिम बंगालहून परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई मेट्रोचे काम सुरू केले आहे. ही विकासकामे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहोत. - आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

४ लाख ८१ हजार मजूर मुंबईत दाखल

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत. जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. मुंबईच्या रेल्वे स्थानकावर दररोज १५ ते २० हजार मजूर दाखल होत आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्यात लॉकडाऊन लागू केल्यावर श्रमिक विशेष ट्रेनद्वारे मोठ्यासंख्येने कामगार आपल्या मूळगावी गेले. यामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार येथील सर्वाधिक मजूर आपल्या गावी गेले. पण आता राज्यात अनलॉक सुरू झाले आहे. त्यामुळे मजुरांना पुन्हा मुंबईच्या वाटेवर आहेत.मुंबईत १ जून ते २५ जून यादरम्यान उत्तरप्रदेशातून १ लाख ९१ हजार ७४१ मजूर, बिहार मधून ८३ हजार ५१५ मजूर, राजस्थानमधून ५८ हजार ३६४ मजूर, पश्चिम बंगालमधून २२ हजार ५६५ मजूर, केरळ मधून १७ हजार २ मजूर, कर्नाटकमधून १९ हजार १०७ मजूर, तेलंगणामधून ११ हजार १७५, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथून ७८ हजार ४२४ मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत.

टॅग्स :मेट्रोस्थलांतरण