२० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 

By संजय घावरे | Published: November 6, 2023 08:24 PM2023-11-06T20:24:40+5:302023-11-06T20:25:04+5:30

५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

54th International Film Festival of India will be held in Goa from November 20 to 28 | २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 

२० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 

मुंबई - ५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर असलेला भारतातील प्रसार माध्यम आणि मनोरंजन उद्योग ही देशाची लक्षात घेण्याजोगी ताकद असल्याचे ठाकूर या प्रसंगी म्हणाले. गेल्या तीन वर्षांत सरासरी २०% वार्षिक वाढीसह हा उद्योग दरवर्षी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या वर्षीचा 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' जागतिक चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाणारे मायकल डग्लस यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. ठाकूर म्हणाले की, इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागात चित्रपटांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. यातून इफ्फीसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगाचे आकर्षण वाढत असल्याचे दिसून येते. कोविडच्या काळात ओटीटी व्यासपीठाने भारतात जम बसवला असून, या व्यासपीठाने भारतात तयार होत असलेल्या आशयघन कलाकृती हजारो लोकांना रोजगार देत आहेत. दरवर्षी सुमारे २८% वाढ नोंदवणाऱ्या या क्षेत्राच्या चैतन्यपूर्ण विकासाला प्रतिसाद म्हणून मंत्रालयाने ओटीटीवरील निर्मात्यांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार सुरू केला आहे. यंदा या पुरस्कारासाठी १५ ओटीटीवरुन १० भाषांमधील एकूण ३२ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, विजेत्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असेही ठाकूर म्हणाले. इफ्फी हा जगातील सर्वात मोठा चित्रपट आणि सांस्कृतिक महोत्सव असल्याचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आपल्या संक्षिप्त निवेदनात सांगितले. या महोत्सवातील आंतरराष्ट्रीय ज्युरीचे नेतृत्व चित्रपट निर्माते शेखर कपूर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो
ठाकूर म्हणाले की, चित्रपट क्षेत्रातील स्टार्टअप प्रणालीला चालना देण्यासाठी तसेच देशाच्या दुर्गम भागातील, कानाकोपऱ्यातील प्रतिभावंताचा शोध घेण्यासाठी 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' उपक्रम सुरू केला आहे. यावर्षी या विभागात ६०० हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. त्यातून ७५ विजेत्यांच्या निवडीनंतर गेल्या तीन वर्षातील २२५ विजेत्यांना पुरस्कार देण्यात येईल.

दृष्टिहीनांसाठी श्राव्य वर्णन
दृष्टिहीनांसाठी श्राव्य वर्णन, कर्णबधीरांसाठी सांकेतिक भाषा तसेच आशयाचे अनेक भाषांमध्ये डबिंग हे 'सबका साथ सबका विकास' या मंत्राचे प्रतीक असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

यंदाचे आकर्षण
आंतरराष्ट्रीय विभागात १३ जागतिक प्रीमियरसह १९८ चित्रपट दाखवले जाणार आहेत. ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सुरुवात होईल, तर 'अबाऊट ड्राय ग्रासेस' हा चित्रपट महोत्सवाच्या मध्यात दाखवला जाईल आणि 'द फेदरवेट' या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. या वर्षी जगभरातील विविध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेत्या १९ चित्रपटांचा कॅलिडोस्कोपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वर्षी ३०० आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्प निर्मिती, वितरण किंवा विक्रीसाठी 'फिल्म बाजारच्या' सतराव्या आवृत्तीत जतन करून प्रदर्शित केले गेले. प्रख्यात चित्रपट निर्माते, छायाचित्रकार आणि अभिनेत्यांसह २० हून अधिक 'मास्टरक्लासेस' तसेच 'संवाद' सत्र आयोजित केले जातील.
 

Web Title: 54th International Film Festival of India will be held in Goa from November 20 to 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.