धक्कादायक! ब्रिटनमधून 55 नागरिक कल्याणमध्ये दाखल; राज्य सरकारने महापालिकेला धाडली यादी
By मुकेश चव्हाण | Published: December 24, 2020 06:49 PM2020-12-24T18:49:39+5:302020-12-24T18:50:03+5:30
ब्रिटनमधून आलेल्या 55 प्रवाशांचा शोध घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरु झाली आहे.
मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातलेला असताना इंग्लंडून नागपुरात दाखल झालेला एक तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. चिंताजनकबाब म्हणजे इंग्लंडच्या प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा 28 वर्षीय तरुण कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याचदरम्यान राज्य सरकारला धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देशात गेल्या महिन्याभरात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. याचदरम्यान कल्याणमध्ये 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत 55 नागरिक ब्रिटनमधून परतले असून या नागरिकाची यादी राज्य शासनानं महापालिकेला धाडली आहे. या सर्वांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमधून आलेल्या 55 प्रवाशांचा शोध घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाची सुरु आहे. या प्रवाशांची नावं, पत्ते, फोन नंबरची यादी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे धाडण्यात आली असून या नागरिकांना संपर्क करून त्यांची पुन्हा चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली मधील कोरोना रुग्णाचे प्रमाण वेगाने कमी होत असून सध्या केवळ 1000 रुग्ण उपचार घेत असून 55 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र राज्य शासनाच्या या नव्या यादीमुळे मागील नऊ महिन्यानंतर आता कुठे मोकळा श्वास घेत असलेल्या पालिका प्रशासनाची झोप उडाली असून आरोग्य विभागाची धावपळ वाढली आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात 22 डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
अन्य राज्यांतील प्रवाशांची रवानगी
ब्रिटनमधून येणारे 236 प्रवासी महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कळविण्यात आले आहे, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.