Join us

BCA, BBA, BMS सीईटीकरिता ५५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

By रेश्मा शिवडेकर | Published: May 03, 2024 8:54 PM

या परीक्षेच्या नोंदणीकरिता ४ आणि ५ मे अशी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीसीए, बीबीए, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाकरिता प्रथमच होणाऱया सीईटीसाठी राज्यभरातून आतापर्यंत ५५ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली  आहे.  मागील  वर्षी  झालेल्या  प्रवेशांच्या  तुलनेत  फारच  कमी अर्ज आल्याने या परीक्षेच्या नोंदणीकरिता ४ आणि ५ मे अशी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्याच्या सीईटी सेलकडून यंदाच्या वर्षी प्रथमच ही परीक्षा घेतली जात आहे. बीसीए, बीबीए, बीएमएस हे अभ्यासक्रम पारंपरिक कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात चालविले जातात. त्यांचे प्रवेश आतापर्यंत बारावीच्या गुणांवर होत होते. परंतु, एआयसीटीईने आपल्या अन्य इंजिनिअरिंग, फार्मसी  या  अभ्यासक्रमांप्रमाणे याही अभ्यासक्रमांना ‘व्यावसायिक’ असा दर्जा दिल्याने आणि त्यांच्या नियमनाची जबाबदारी घेतल्याने सीईटीद्वारे त्यांचे प्रवेश करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यानुसार सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता राज्यस्तरावर सीईटी घेतली जात आहे.  या  अभ्यासक्रमांबरोबरच  एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमांकरिताही ही सीईटी होणार आहे.

नोंदणी कमी

दरवर्षी हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. त्या तुलनेत फारच कमी विद्यार्थ्यांनी सीईटीकरिता नोंदणी केली आहे. सीईटीबाबत अजुनही अनेक विद्यार्थी –पालकांना माहिती नसल्याने इतकी कमी नोंदणी झाली आहे.

७० हजारांहून अधिक प्रवेश

रोजगाराभिमुख असल्याने राज्यभरात या अभ्यासक्रमांना चांगली मागणी आहे. गेल्या वर्षी राज्यभरात ७३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. त्यात मुंबईतील साधारणपणे १४ हजार तर पुण्यातील १५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रवेशांच्या तुलनेत यंदा केवळ ५५ हजार अर्जच आले आहेत.

सीईटीत येणारे अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (बीसीए), बचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड 

टॅग्स :परीक्षा