५५० कलाकार, ५ हजार कलाकृती अन् १५० कलादालने!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 07:17 AM2024-02-09T07:17:28+5:302024-02-09T07:17:59+5:30

इंडिया आर्ट फेस्टिव्हलला कलाप्रेमींची गर्दी; लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी दिली भेट

550 artists, 5 thousand works of art and 150 art galleries in mumbai art festival | ५५० कलाकार, ५ हजार कलाकृती अन् १५० कलादालने!

५५० कलाकार, ५ हजार कलाकृती अन् १५० कलादालने!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या १२ व्या पर्वात ५५० चित्र-शिल्पकार एकत्र येत असून वरळीतील नेहरू सेंटर येथे ५ हजार कलाकृती आणि १५० स्टॉल्समधून आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे शुक्रवारी उद्घाटन झाले. लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी या फेस्टिव्हलला भेट देत कलाकृतींचा सृजनशील प्रवास जाणून घेत कलाकारांशी संवाद साधला.

या फेस्टिव्हलमध्ये दर्डा यांनी गुरगाव येथील उछान, मुंबईच्या दीपा कुलकर्णी, ‘मानिनी’च्या नेहा ठाकरे, मुंबई येथील आर्टविस्टा, ग्रेस्केल, अन्वेशी विंटेज जेम्स अँड आर्ट हाउस, जालंधर येथील रितीका अरोरा या कलाकारांच्या दालनांना भेट दिली. या भेटीत कलाकारांशी गप्पा मारत कलाकृतींचा निर्मिती प्रवास जाणून घेतला. रात्रंदिवस मेहनत घेऊन साकारलेल्या या कलाकृती कला रसिकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या असल्याचेही सांगितले. दर्डा यांनी देशभरातून आलेल्या कलाकारांच्या  कलाकृतींचे वैशिष्ट्य जाणून घेत, कलेची शैली-माध्यमही जाणून घेतले. या कलाकृतींना त्यांनी मनमोकळी दादही दिली.

  चारकोलची जादू चित्र  
  जिवंत करते तेव्हा...  
 इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये लातूरचे कलाकार ओम थडकर यांची चारकोल आणि ग्रेफाइटचा वापर करून रेखाटलेली चित्रे लक्ष वेधून घेत आहेत. 
 या प्रदर्शनात गौतम बुद्ध, वाघ आणि महिलेचा चेहरा लक्षवेधक आहे. लहानपणापासून शाळेत काही तासांसाठी असलेल्या चित्रकलेलाच ओम यांनी आपले करिअर म्हणून निवडले आहे. 
 कलेच्या क्षेत्रात विविध माध्यमांत प्रयोग केल्यानंतर अखेरीस चारकोलपासून तासनतास केलेले रेखाटन अत्यंत मनमोहक आणि कलारसिकांचे मन जिंकणारे आहे, असे यावेळी 
डॉ. विजय दर्डा म्हणाले. डॉ. विजय दर्डा यांनी या चित्रांच्या बारकाव्यांचे आणि त्यातून चित्र जिवंत करण्याच्या अनोख्या कलेचे कौतुक केले.

इंडिया आर्ट फेस्टिव्हल ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत कलारसिकांसाठी खुले राहणार आहे. फेस्टिव्हलच्या निमित्ताने एकाच वेळी नवोदित, प्रस्थापित आणि दिग्गज कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी कला रसिकांना मिळत आहे. पहिल्याच दिवशी कला रसिकांचा मिळालेला प्रतिसाद हा आयोजक या भूमिकेतून प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आहे.
- राजेंद्र पाटील, संचालक, इंडिया आर्ट फेस्टिव्हल 

Web Title: 550 artists, 5 thousand works of art and 150 art galleries in mumbai art festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.