५,५०० मीटरचा तिरंगा फडकला

By admin | Published: August 15, 2015 10:52 PM2015-08-15T22:52:29+5:302015-08-15T22:52:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि शांतीचा संदेश देण्यासाठी नवी मुंबईत पहिल्यांदाच

The 5,500 meter tricolor flaps | ५,५०० मीटरचा तिरंगा फडकला

५,५०० मीटरचा तिरंगा फडकला

Next

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि शांतीचा संदेश देण्यासाठी नवी मुंबईत पहिल्यांदाच एक भव्य स्वातंत्र्योत्सव सोहळा साजरा करण्यात आला. एनआरआय कॉलनी नेरुळ ते सानपाडा येथील मोराज सर्कल अशी मानवी साखळी तयार करून ५५०० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. हा नेत्रदीपक क्षण अनुभवण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्वातंत्र्योत्सवात शिरवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सेंट झेविअर्स हायस्कूल नेरूळ, बाळाराम पाटील हायस्कूल दारावे अशा अनेक शाळांमधील ५ हजार ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सर्वात मोठे योगदान असलेल्या थोर पुरुषांच्या वेशभूषेत उपस्थित सर्वच तरुण-तरुणींनी पुन्हा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शाळकरी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेटी बचाव, बेटी पढाओ, स्वच्छता की ओर एक कदम, पाणी वाचवा अशा घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्राईड आॅफ नेशनचे कासिम दस्थागिरी यांनी हा राष्ट्रध्वज तयार केला होता. या माध्यमातून देशाप्रतिचे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अखेर जागतिक स्तरावरील नोंद राहिलीच
वर्ल्ड रेकॉर्ड होणार असल्याने नागरिक मोठ्या आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होते. काही कारणांमुळे या विश्वविक्रमाची ही नोंद झाली नाही. त्यामुळे सर्वच स्तरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. विश्वविक्रमासाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती पण अखेर शेवटी तसे झालेच नाही.

५००० फुगे आकाशात सोडून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ५५०० मीटर लांबींच्या या राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे, उप आयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, भाजपाचे महाराष्ट्र सरचिटणीस संजय उपाध्याय, प्राईड आॅफ नेशनचे अध्यक्ष कासीम दस्थागिरी उपस्थित होते. नगरसेवक दीपक पवार, रामचंद्र घरत, संपत शेवाळे, उषा पाटील, उज्ज्वला झांजाड, प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ. राजेश पाटील, सहभागी सर्व शाळांचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची हाल, पोलिसांची दमछाक
सकाळपासून पामबीच मार्गावर उभे असलेले शाळकरी विद्यार्थी मात्र भूकेने व्याकूळ झाले होते. दुपारी उन्हात उभे राहून विद्यार्थी कंटाळले होते. शिक्षकांनाही क्षणभर विश्रांती मिळाली नाही.
शाळेचा कार्यक्रम संपवून लगेचच या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने खूप धावपळ झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचा आणि सहभागी नागरिकांच्या सुरक्षेचा भार पेलणारी पोलीस यंत्रणेचीही दमछाक झाली.
या ठिकाणाहून त्या ठिकाणी अशा धावपळीने पोलिसांचा जीवही तहानेने व्याकूळ झाला होता. या राष्ट्रध्वजाला पुढे नेताना यामध्ये सहभागी सर्वच नागरिकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.
उन्हामुळे उपस्थित प्रत्येकाच्या अंगाची लाही लाही होत असताना तिथे सकाळपासून उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांची मात्र कोणीच दखल घेतली नाही.

Web Title: The 5,500 meter tricolor flaps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.