Join us

कोकण मंडळाच्या ९०१८ सदनिकांसाठी ५५३२४ अर्ज प्राप्त, २५ ऑगस्ट रोजी सोडत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 8:42 PM

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९०१८  परवडणाऱ्या सदनिकांच्या विक्रमी ऑनलाईन सोडतीकरीता ५५,३२४ अर्जांचा यशस्वी प्रतिसाद मिळाला

 मुंबई - म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९०१८  परवडणाऱ्या सदनिकांच्या विक्रमी ऑनलाईन सोडतीकरीता ५५,३२४ अर्जांचा यशस्वी प्रतिसाद मिळाला असून या अर्जदारांना सदनिका वितरणाकरिता शनिवार, दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी १० वाजता संगणकिय सॊडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी आज दिली.  

       माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारी ही सोडत मुंबई उपनगरचे माननीय पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून  माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर, माननीय खासदार श्रीमती पूनम महाजन, माननीय आमदार श्रीमती तृप्ती सावंत, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर उपस्थित राहणार आहेत.       या सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच आपला निकाल जाणून घेता येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही  "वेबकास्टिंग" तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहता येण्यासाठी मंडप उभारण्यात येणार असून भवनात होणाऱ्या संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे याकरिता एलईडी स्क्रीन देखील लावण्यात येणार आहेत.        यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ५१८ सदनिका व प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत  शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण) येथील ३९३७ अशा एकूण ४,४५५ सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.                     मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडा मुख्यालयात दि. २७ ऑगस्ट २०१८ ते ०१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या   योजना संकेत क्रमांकामधील २७०, २७१, २७२ व २७५ विजेत्यांनी कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.      सोडतीमधील विजेत्या तसेच प्रतिक्षाधीन अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in  या वेबसाईटवर दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे, याची संबंधित अर्जदारांनी नोंद घ्यावी.

टॅग्स :घरम्हाडा