लोकलमधून पडल्याने ५५६ प्रवाशांनी गमाविला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:49 AM2019-12-18T05:49:39+5:302019-12-18T05:49:49+5:30
१ हजार २६९ प्रवासी जखमी; जानेवारी ते नोव्हेंबर, २०१९ या कालावधीतील आकडेवारी, सर्वाधिक ६७ मृत्यू कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. मात्र, वेळापत्रक बदलूनही गर्दीच्या लोकलमध्ये चढल्याने पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. मंगळवारी डोंबिवली-कोपर दरम्यान २२ वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला, तर जानेवारी ते नोव्हेंबर, २०१९ या कालावधीत धावत्या लोकलमधून पडून ५५६ प्रवाशांनी जीव गमावला.
याच कालावधीत लोकलमधून पडून १ हजार २६९ प्रवासी जखमी झाले. सर्वाधिक ६७ मृत्यू हे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. कुर्ला हद्दीत एकूण ६७ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सर्वाधिक १३६ प्रवासी हे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जखमी झाले.
‘समस्या सोडवा’
दररोज डोंबिवलीतील महिलांना लोकलच्या गर्दीला पर्यायाने मृत्यूला सामोरे जावे लागते, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी समिती सदस्या वंदना सोनावणे यांनी दिली.
दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाकडून वारंवार उपाययोजना केल्या जातात. प्रत्येक स्थानकात सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. याद्वारे गर्दीचे नियोजन केले जाते. लेडिज स्पेशल लोकल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
४२० जणांवर कारवाई
लोकलच्या फूट बोर्डावरून, रूफ टॉपवरून प्रवास करणाºया प्रवाशांवर मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे कारवाई केली जाते. जानेवारी ते नोव्हेंबर, २०१९ या कालावधीत ४२० जणांवर कारवाई करून १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवाशांच्या जनजागृतीसाठी ‘माय लेफ्ट इज माय राइट’ मोहीम
मध्य रेल्वे मार्गावर दोन लेडिज स्पेशल लोकल धावतात, तर हार्बर मार्गावर दोन लेडिज स्पेशल धावतात. १५ डब्यांच्या ६ लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावतात. रेल्वे सुरक्षा बलाकडून ‘माय लेफ्ट इज माय राइट’ ही मोहीम ७ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
सोशल मीडियावरून मध्य रेल्वेचा निषेध
च्२२ वर्षीय चार्मी पासड डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान पडून जिवाला मुकल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरून चार्मीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. यासह प्रवाशांनादेखील गर्दीच्या लोकलमध्ये न चढण्याचे आवाहन प्रवाशांनी केले.
च्मध्य रेल्वेच्या दररोजच्या लेटमार्कचा, तसेच ढिसाळ कारभाराचा प्रवाशांनी निषेध केला आहे.