Join us

५५व्या वाढदिवशी, ५५वे नाटक

By संजय घावरे | Published: April 23, 2024 9:20 PM

पुष्कर श्रोत्री साकारणार १० फुटी व्यक्तिरेखा; ३२ वर्षांमध्ये प्रथमच करणार बालनाट्य.

मुंबई - मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांचे मनोरंजन करणारा अभिनेता पुष्कर श्रोत्री ३२ वर्षांच्या करियरमध्ये प्रथमच बालनाट्यात काम करणार आहे. 'आज्जीबाई जोरात' या नाटकात तो १० फुटी व्यक्तिरेखा साकारणार आहे. ५५ वर्षीय पुष्करचे हे ५५वे नाटक त्याच्या वाढदिवशी म्हणजेच ३० एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे.  लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांच्या ‘आज्जीबाई जोरात’ या नव्या कोऱ्या बालनाट्याची सध्या जोरदार तालीम सुरू आहे. 

जिगीषा-अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकात ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे आदी कलाकार आहेत. विनोदी अंगाने जाणारी फँटसी असलेल्या या नाटकाबाबत पुष्कर म्हणाला की, कसदार कलाकारांची फळी या नाटकात आहे. यात गाणी, नृत्य, विनोद, अॅनिमेशनसह जादूही आहे. या नाटकात माझी एन्ट्री १० फुटांच्या व्यक्तिरेखेच्या रूपात होणार आहे. प्रेक्षकांना पहिल्यांदाच १० फुटांचा पुष्कर श्रोत्री दिसणार आहे. हा माणूस १० फुटांचा का झाला, हे आजीबाईच्या गोष्टीतून उलगडेल. माझी उंची नॉर्मल करण्यासाठी अभिनय बेर्डे काय करतो हे नाटकात पाहायला मिळेल. या नाटकात गंमत आणि खेळही आहे. हे नाटक प्रेक्षकांना सहभागी करून घेणारे आहे. रसिक केवळ खुर्चीत बसून हे नाटक बघणार नाहीत, तर त्यात सहभागीही होतील. मुलांसह त्यांच्या पालकांनाही नाचण्याची संधी मिळणार आहे. कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी छान डान्स बसवला आहे. मध्यंतरानंतरचा एक डान्स रसिकांसोबत सादर होणार आहे. फुल टू धमाल असल्यानेच या नाटकाला महाबालनाट्य म्हटले जात आहे. ३० एप्रिलला मी ५५व्या वर्षात पदार्पण करतोय आणि माझे हे ५५वे नाटक आहे. हा 'आज्जीबाई जोरात'च्या निमित्ताने जुळून आलेला दुग्धशर्करा योग असल्याचे पुष्कर म्हणाला. 

झुपकेदार मिशी, कपाळाला टिळा, सदरा आणि पट्टेरी पायजमा असा पुष्करच्या व्यक्तिरेखेचा गेटअप आहे. १० फुटांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी पुष्करने खूप मेहनत घेतली आहे. आतापर्यंतच्या ३२ वर्षांच्या करियरमध्ये पुष्करने बालनाट्य केलेले नव्हते. 'आज्जीबाई जोरात'मुळे त्याला बालनाट्य करण्याची संधी मिळाली आहे. 

या नाटकाद्वारे अभिनय बेर्डे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार असून, जयवंत वाडकर २० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी,  प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रकाश मुळ्ये, तर वेशभूषा कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी केली आहे. संगीत सौरभ भालेराव यांनी दिले असून, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबई