मुंबई - मिठी नदी रुंदीकरणात अडथळा ठरणारी ५६ बांधकामे गुरुवारी तोडण्यात आली. ‘एल’ विभागाच्या कुर्ला पश्चिम येथे किस्मतनगर परिसरातील व्यापारी बांधकामांवर ही कारवाई झाली. गेली दहा वर्षांमध्ये नदी रुंदीकरण प्रकल्पाच्या निमित्ताने झालेली ही पहिली कार्यवाही आहे. कुर्ला विभागातील मिठी नदीच्या पात्रात गेली अनेक वर्षांपासूनची ही बांधकामे अडथळा ठरत होती. उपायुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
कलिना पूल ते सीएसटी पूल दरम्यान एकूण ९०० मीटर क्षेत्रात नदीपात्रात तसेच नदीच्या काठावर अशी एकूण ७५० बांधकामे नदी रुंदीकरण प्रकल्पाला अडथळा ठरत आहेत. या प्रकल्पांतर्गत ५६ बांधकामे पडण्याची पहिली कारवाई झाली. प्रामुख्याने नदीपात्रात अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यात आली.
कारवाईसाठी मोठा फौजफाटा या कारवाईत पालिकेचे १५ इंजिनिअर आणि १०० कामगारांची मदत घेण्यात आली. तर, ५० पोलिस यावेळी बंदोबस्ताला होते. या कार्यवाहीनंतर नदी रुंदीकरण प्रकल्पासोबतच सेवा रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असे हेर्लेकर यांनी सांगितले.
एकर क्षेत्रफळाचा भूखंड मुक्तपालिकेच्या नोटिसीविरोधात काही गोदाम मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. गेली दहा वर्षांपासून ही कारवाई प्रलंबित होती. आज झालेल्या कार्यवाहीत एक एकर क्षेत्रफळाचा भूखंड मुक्त करण्यात आला.