लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरू करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या तीन हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ५६ टक्के कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. तर अत्यावश्यक सेवेतील ७३०० कर्मचाऱ्यांपैकी ६२५५ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला.
मुंबईत १६ फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत एक लाख ५३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काहीसा अनुत्साह असल्याचे चित्र आहे. मात्र कोविन ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे ही संख्या कमी असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील ५५ हजार ३०५ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे.
शुक्रवारी २६ लसीकरण केंद्रावर १० हजार ३०० लाभार्थीपैकी सात हजार ९२० म्हणजे ७७ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यापैकी लसीचे सर्वाधिक प्रमाण नायर आणि के. ई. एम रुग्णालय व वांद्रे येथील जम्बाे कोविड सेंटरमध्ये होते. आतापर्यंत एक लाख ५५ हजार ३५८ कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
........................