लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे मुंबईत रोज ४० ते ५० रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातच आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजाराने ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र यापैकी बहुतेक मृत्यू हे मुंबईबाहेरील रुग्णांचे असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
म्युकरमायकोसिस म्हणजेच बुरशी या आजाराचे रुग्ण सुरुवातीला तुरळक प्रमाणात आढळून येत होते. मुंबईमधील रुग्णालयात वर्षाला चार ते पाच रुग्ण आढळून येत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात ३१ मेपर्यंत तब्बल ४४९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत उपचार घेत असलेल्या म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण इतर जिल्ह्यातील व परराज्यातील आहेत. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, काश्मीर या राज्यासह नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यातील रुग्ण मुंबईमध्ये उपचार घेत आहेत. मुंबईमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने ५६ मृत्यू झाले असले तरी, मुंबईमधील १४ रुग्णांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
कोविडवर मात केलेल्या सरासरी १० टक्के रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची गंभीर लक्षणे दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र तसेच ओडिशा, गुजरात, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यात म्युकरमायकोसिस ही महामारी घोषित करण्यात आली आहे. रुग्ण वाढत असल्याने या बुरशीजन्य आजाराची दाहकता कमी करण्यासाठी ॲम्फोटेरिसीन बी, फोटॉन, लिपो सोमॉल यासारख्या अँटिफंगस औषधांची मागणी पूर्वीच्या तुलनेत ४०० पटींनी वाढली आहे. या आजारावरील औषधांचाही अचानक मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
* एका आठवड्यात रुग्णांचे प्रमाण गेले ३० टक्क्यांवर
एका आठवड्यापूर्वी मुंबईमधील रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या २२५ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ५ टक्के रुग्ण मुंबईतील होते. एका आठवड्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकाच आठवड्यात रुग्णांचे प्रमाण ३० टक्क्यांवर गेले आहे. मुंबईमध्ये ३१ मेपर्यंत म्युकरमायकोसिसमुळे ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १४ मृत्यू हे मुंबईमधील आहेत.
...........................................