मुंबई : कर्जत-पनवेल या नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यांमध्ये खडीरहित रूळ (बॅलेस्ट-लेस ट्रॅक) टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. प्रकल्पाचे ५६ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट ३ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन च्या माध्यमातून या कॉरिडॉचे काम सुरू आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान २९.६ किमी लांबीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची २,७८२ कोटी रुपये इतकी किंमत आहे.
कर्जत ते पनवेलदरम्यान उभारण्यात येत असलेल्या नवीन रेल्वे मार्गामध्ये तीन बोगदे आहेत. बोगद्यांच्या भुयारीकरणासाठी न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीचा वापर केला आहे.
या बोगद्यांपैकी २ किमी लांबीच्या वावरली बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तो संपूर्ण मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे.
या प्रकल्पामध्ये दोन रेल्वे उड्डाणपूल, ४४ मोठे आणि लहान पूल, १५ रस्त्यांखालील पूल आणि सात रस्त्यांवरील पूल आहेत.
कर्जत-पनवेलदरम्यान असलेली सध्याची मार्गिका माल आणि काही मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी वापरली जाते. नवीन डबल लाईन कॉरिडॉरमुळे मुंबई ते कर्जतदरम्यान पनवेलमार्गे लोकल गाड्या चालवता येणार आहेत.
डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण?
प्रकल्पातील बोगद्यांमध्ये बॅलेस्ट-लेस ट्रॅक टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
सोबतच सार्वजनिक आश्रय क्षेत्र, एक बोगदा नियंत्रण प्रणाली, प्रकाशव्यवस्था, अग्निशामक यंत्रणा, वायुविजन प्रणालीचे काम सुरू आहे, प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पातील स्थानके
पनवेल मोहोपे चिकले चौक कर्जत