मुंबई : एका अमेरिकन नागरिकाला तांत्रिक साहाय्य देण्याच्या नावाखाली ४.५ लाख डॉलर्सची फसवणूक करणाऱ्या विष्णू राठी या सायबर भामट्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी अटक केली.
सीबीआयने ऑपरेशन चक्र ३ अंतर्गत ही कारवाई केली. मुंबईसह कोलकाता येथे सात ठिकाणी छापेमारी करत ५७ सोन्याचे बार, १६ लाखांची रोकड, मोबाइल, क्रिप्टो करन्सीसाठी वापरलेला लॅपटॉप, लॉकर्सचा तपशील आणि अन्य गुन्ह्यांची कागदपत्रे जप्त केली आहेत.
टेक सपोर्ट सर्व्हिसेस ऑफर करण्याच्या बहाण्याने त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या तक्रारदाराला त्याच्या बँक खात्याशी तडजोड केल्याची खोटी माहिती देत जाळ्यात ओढले. कथितरीत्या, पीडितेला त्यांच्याद्वारे नियंत्रित केलेल्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये ४.५ लाख डॉलर्सची फसवणूक केली.
मुंबई, कोलकाता येथे छापा
सायबर गुन्ह्यांचा धोका लक्षात घेता सीबीआयने ऑपरेशन चक्र राबवत या गुन्हेगारांचे नेटवर्क नष्ट करण्याच्या दृष्टीने ही कारवाई सुरू केली आहे. विशेषतः परदेशातील नागरिकांना टार्गेट करून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे, अशी माहिती सीबीआयने दिली.
सीबीआयने गेल्या दोन दिवसांत मुंबई, कोलकाता येथे सात ठिकाणी केलेल्या झडतीमध्ये प्रत्येकी १०० ग्रॅम सोन्याचे ५७ बार, १६ लाखांची रोख रक्कम, मोबाइल फोन, लॅपटॉप, लॉकर्सचा तपशील आणि गुन्ह्यांची कागदपत्रे जप्त केली. या कारवाईच्या आधारे मुंबईतील विष्णू राठीला अटक केली आहे. त्याच्या घरातून जप्त ऐवजातून महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयच्या हाती लागली आहे. तो आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सीबीआयने ९ सप्टेंबर रोजी राठीसह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आरोपींनी जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान अमेरिकन नागरिकाच्या संगणक आणि बँक खात्यात अनधिकृत रिमोट एक्सेस मिळवून त्याला टार्गेट केले.