Join us

इर्शाळवाडीतील बेपत्ता ५७ ग्रामस्थ मृत घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 10:26 AM

दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी आदिवासी वाडीवर १९ जुलैला रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर २७ जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. पाऊस आणि परिसरात सुटलेली दुर्गंधी यामुळे शोध मोहीम शासनाने थांबवली होती. ५७ जण बेपत्ता असल्याचे शासनाने घोषित केले होते. दरडीखाली गाडले गेलेल्या ५७ जणांना मृत घोषित करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रशासनाच्या या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून ५७ जणांना मृत घोषित केले आहे. 

मृताच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत उपसचिव संजय धारूरकर यांनी कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी रायगड यांना पत्राद्वारे कळविले आहे. इर्शाळवाडीत ४७ घरांमध्ये २२८ ग्रामस्थ राहत होते. १९ जुलैची रात्र या सर्वांसाठी काळरात्र ठरली हाेती. 

२७ मृतदेहांचा शाेध लागला  वाडीवर दरड कोसळून अनेक जण त्याखाली गाडले गेले. त्यानंतर तातडीने प्रशासनाने बचाव व शोध कार्य सुरू केले.  मात्र ही वाडी डोंगर भागात असल्याने यांत्रिकी मदत पोहोचणे शक्य झाले नव्हते. अशाही परिस्थितीत एनडीआरएफ, टीडीआरएफ, स्थानिक, पोलिस यांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले होते.  तीन दिवस शोधकार्य करून २७ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतर शासनाने शोध मोहीम थांबवली होती. 

चौक मानिवलीत कायमस्वरूपी पुनर्वसन इर्शाळवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन हे चौक मानिवली येथे केले जाणार आहे. जागा उपलब्ध करून दिली आहे. सिडकोमार्फत याठिकाणी वसाहत उभारली जाणार आहे. शासनाने १५ दिवसांत इर्शाळवाडी गावाचे तात्पुरते पुनर्वसन करून त्यांच्या राहण्याची सोय केली आहे. कायमस्वरूपी वसाहतीसाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. वसाहत उभारणीच्या कामालाही वेग आल्यास दिवाळीपूर्वी आदिवासी बांधव स्वत:च्या घरात राहण्यास जाऊ शकतात. मात्र, यासाठी सिडकोतर्फे त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.

सोमवारपासून अनुदान वाटपदुर्घटनेतील २७ मृतांच्या वारसांना प्रशासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र, बेपत्ता असलेल्या ५७ जणांचे वारस हे अनुदानापासून वंचित होते. बेघर झालेल्या कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये करण्यात आले आहे. आता बेपत्ता वारसांना सोमवारपासून अनुदान वाटप केले जाणार आहे. 

टॅग्स :सातारा परिसरमृत्यूपाऊसमुख्यमंत्री