मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील ५७ टक्के लोकांनी कोरोनाला परतवून लावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 06:17 AM2020-07-29T06:17:34+5:302020-07-29T06:17:56+5:30

अँटिबॉडी तयार झाल्याची सेरो सर्वेक्षणात माहिती : महिलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक

57% of Mumbai slum dwellers return Corona back | मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील ५७ टक्के लोकांनी कोरोनाला परतवून लावले!

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील ५७ टक्के लोकांनी कोरोनाला परतवून लावले!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेने तीन विभागांमध्ये केलेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये झोपडपट्ट्यांमधील ५७ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडी
(प्रतिद्रव्ये) तयार झाल्याचे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कोविडविरोधात लढण्याची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याचे समोर आले आहे. एकूण संसर्गाच्या प्रमाणापैकी लक्षणे नसलेल्या बाधितांचे प्रमाण जास्त असू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


मुंबईमध्ये सार्स-कोविड २ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, महापालिका, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांनी संयुक्तरीत्या सुरू केला होता. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रान्सलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवम् प्रौद्योगिकी संस्थान ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हेदेखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी होते.


पहिल्या फेरीमध्ये आठ हजार ८७० पैकी एकूण सहा हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून दहिसर, माटुंगा, वडाळा, चेंबूर या तीन विभागांत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात झोपडपड्ड्यांमधील ५७ टक्के तर बिगर झोपडपट्टी विभागातील १६ टक्के नागरिकांमध्ये कोविडविरोधातील प्रतिदव्ये तयार झाल्याचे निदर्शनास आले. यावरून या परिसरातील ५७ टक्के नागरिकांना कोविडची बाधा झाली होती. त्यांच्यावर कोणतेही उपचार न होता स्वत:च्या रोगप्रतिकारक शक्तीच्या आधारे त्यांनी कोविडवर मात केली आहे, असा अंदाज काढता येईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

संसर्ग मृत्युदर ०.०५ टक्के
कोविड संसर्गापैकी लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर झोपडपट्टीच्या परिसरातील दाटीवाटीची वस्ती तसेच सामुदायिक सुविधा यामुळे कोविडचा संसर्ग जास्त असल्याची शक्यता महापालिकेने वर्तविली आहे. मुंबईतील मृत्युदर सध्याच्या परिस्थितीत पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, या सर्वेक्षणाच्या आधारावरून संसर्ग मृत्युदर हा ०.०५ ते ०.१० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.


शंभर दिवसांतील सर्वांत कमी रुग्णवाढ
मुंबई महापालिकेने मंगळवारी सर्वाधिक ८,७७६ संशयित रुग्णांची चाचणी केली. यापैकी केवळ सातशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. गेल्या शंभर दिवसांतील बाधित रुग्णांचा हा सर्वांत कमी आकडा असल्याची माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
हर्ड इम्युनिटीचा अभ्यास : या सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यात सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्युनिटी) म्हणजे नागरिकांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेली रोगप्रतिकार शक्तीबाबत माहिती मिळू शकेल. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Web Title: 57% of Mumbai slum dwellers return Corona back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.