स्नेहा मोरे
मुंबई - मुंबईत ५७ वर्षीय महिलेने केलेल्या अवयवदानातून सात जणांना जीवदान मिळाले आहे. महिलेवर नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु तिला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले होते. या महिलेने टिश्यू, कॉर्निया, हाडेही दान केली आहेत. याद्वारे मुंबईतील हे २६ वे यशस्वी अवयवदान झाले आहे.
महिलेने १८ वर्षांपूर्वी अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. तिच्या निधनानंतर कुटुंबाने हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, कॉर्निया आणि हाडे दान करून तिच्या इच्छेचा सन्मान केला. २४ ऑगस्टला या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरक्तस्रावाने तिच्या मेंदूवर परिणाम झाला होता. रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकाने कुटुंबाशी संपर्क साधताच तिच्या कुटुंबाने सर्व अवयवदान करण्यास संमती दिली.
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अवयव निकामे झालेल्या दोन रुग्णांवर मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले; तर सहा वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीवर किडनी, दोन वर्षांपासून यकृताच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ६८ वर्षीय रुग्णाला यकृत, ज्युपिटर रुग्णालयाला हृदय, ग्लोबल रुग्णालयात दुसरी किडनी आणि स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.