Join us

५७१ कोटींची खंडणी मागितल्याने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 6:54 AM

लोढा ग्रुपचे सुरेंद्र नायर यांची तक्रार । मानपाडा पोलिसांचा तपास सुरू

डोंबिवली : लोढा ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र नायर यांच्याकडे ५७१ कोटी ३३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी विकास बागचंदका याच्यासह रोसमेरटा ग्रुप, रुची सोया ग्रुप, सॅमसंग ओव्हरसिस लिमिटेड आणि अशोक मिंदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात राहणारे नायर लोढा डेव्हलपर्समध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष (ग्राहकसेवा) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शुक्रवारी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जानेवारी महिन्यात ते निळजे परिसरात कामानिमित्त आले होते. त्यावेळी, एका इस्टेट एजंटने त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवला व हा मेसेज बागचंदकाने पाठवल्याचे त्यांना सांगितले.त्यांच्या दाव्यानुसार, नायर यांनी मेसेज पाहिला असता, त्यामध्ये लोढा ग्रुपने ५७१ कोटी ३३ लाख रुपये ताबडतोब देण्याची मागणी केली होती. तसे न केल्यास कंपनीतील लोकांना बनावट प्रकरणात अडकवण्याबरोबरच कोठडीत डांबून ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर, मार्च महिन्यात पुन्हा बागचंदकाने अशाच स्वरूपाचा मेसेज पाठवला. तसेच, बागचंदकासह त्याच्या साथीदारांकडून धमक्या देण्याचे सत्र सुरूच असल्याचे नायर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नायर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बागचंदकासह इतरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई