Join us

ठाण्यात १७ दिवसात कोरोनाचे ५७६४ रुग्ण माजिवडा - मानपाडा ठरतोय हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 3:43 PM

सप्टेंबर महिना सुरु झाला आणि शहरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. अवघ्या १७ दिवसात ठाण्यात कोरोनाचे नवीन ५७६४ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ जणांचा मृत्युही झाला आहे.

ठाणे : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत असतांना ठाण्यात मागील १७ दिवसात कोरोनाच्या नवीन ५७६४ रुग्णांची भर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात हॉटस्पॉट ठरलेले माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत याच १७ दिवसांच्या कालावधीत सर्वाधीक १३४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ जणांचा मृत्युही झाला असल्याची माहिती समोर आली आहे.                     ठाणे महापालिका हद्दीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध स्वरुपाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्यात पालिकेला अद्यापहा फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. सोशल डिस्टेसींगचे पालनही ठाणेकरांकडून होत नसल्याचे दिसत आहे. आजही शहराच्या अनेक भागात मार्केटमध्ये नागरीकांची गर्दी दिसत आहे. तोंडाला मास्क लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आवाहन पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. परंतु तरीही त्याकडे कानडोळा होतांना दिसत आहे, ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्ये गर्दी दिसून येत आहे. परराज्यातून येणाऱ्या नागरीकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, किंबहुना जे परराज्यातून येत आहेत, त्यामुळेच आता कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ होतांना दिसत आहे. एकूणच यामुळेच आता सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.आॅगस्ट अखेर पर्यंत महापालिका हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १७४५ एवढी होती. त्यात आता १७ दिवसात १९३४ रुग्णांची भर पडली असून आजच्या घडीला प्रत्यक्ष उपचार घेणाºयांची संख्या ३६७९ एवढी झाली आहे. तर आॅगस्ट अखेर पर्यंत शहरात ८३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. आता हाच आकडा ९१८ वर गेला असून या कालावधीत ७९ जणांचे मृत्यु झाले आहेत. तर अवघ्या १७ दिवसात महापालिका हद्दीत ५७६४ नव्या रुग्णांची भर पडली असून याच कालावधीत ३७५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रिकव्हीर रेट हा ९० टक्यांवरुन आता ८५ टक्यांवर आला आहे. त्यातही माजिवडा मानपाडा या प्रभाग समितीत रोजच्या रोज ५० ते १०० रुग्ण आढळत आहेत. मागील १७ दिवसात या प्रभाग समितीत १३४९ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस ही चितेंची बाब ठरत आहे. त्या खालोखाल नौपाडा प्रभाग समितीतही रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाकोरोना वायरस बातम्या