मुंबई - ' माझे कुटुंब माझी जबाबदारी ' या मोहिमेने चांगलाच प्रभाव दाखवल्यामुळे रुग्णांची संख्या मुंबईत झपाट्याने कमी झाली. त्यामुळे पालिका रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील खाटा आता मोठ्या प्रमाणात रिकाम्या झाल्या आहेत. सध्या मुंबईत केवळ १८ हजार २६ सक्रिय रुग्ण असल्याने ५८ टक्के खाटा रिकाम्या झाल्या आहेत.
कोरोना रुग्ण संख्या सप्टेंबरपासून पुन्हा वाढू लागल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. या काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला. मात्र 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत पालिकेच्या स्वयंसेवकांचे पथक मुंबईत घरोघरी जाऊन तपासणी करीत होते. महिनाभरात या मोहिमेने आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.३८ टक्के एवढा खाली आला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी देखील मंगळवारी वाढून १८२ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ८९ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांपैकी १० हजार ६९१ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. सहा हजार ३६७ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. तर ९६८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत महापालिकेने १५ लाख ४५ हजार ७९४ चाचण्या केल्या आहेत.
अशी आहेत सद्यस्थिती
प्रकार उपलब्ध खाटा... दाखल रुग्ण... रिक्त
एकूण खाटा १८३६२ ... १०६९५ ..७६६७
अति दक्षता २०५२... १४८४.... ५६८
ऑक्सिजन ९१३४ .... ३८०७..... ५३२७
व्हेंटिलेटर ११९४ ... ९३५ ..... २५९