मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना दिली. लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला असून नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारामध्ये 58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोलनाक्यावर, भाजीवाले, चहावाले सगळेच जण कॅशलेस व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बाब आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटलं आहे. लोकांचे वाढचे डिजिटल व्यवहार पाहता पुढील दोन-तीन वर्षात रिझर्व्ह बँकेला नोटांची छपाई करावी लागणार नाही, असंही नितीन गडकरी पुढे म्हणाले. नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. गेल्या काही दिवसांपासून नोटाबंदी आणि जीएसटीवरुन सरकारला विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं. त्यामुळे नोटाबंदीला एक वर्ष झाल्याचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री राज्यभरात नोटाबंदीचे महत्व समजावून सांगत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोटाबंदी निर्णयाच्या एक वर्षपूर्तीनिमित्त मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज आहेत. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात पैसा बँकेत जमा झाला असून तो पैसा काळा पैसा असल्याच्या संशयातून सध्या पैशाची चौकशी सुरू असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हंटलं आहे.
नोटाबंदीमुळे काही लोकांना त्रास झाला परंतु अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. नोटाबंदीनंतर १.३८ लोकांनी ५ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. तसंच 'नोटाबंदीनंतर काश्मीरमधील दगडफेक कमी झाली, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं. नोटाबंदीमुळे संपूर्ण देश हसला पण राहुल गांधी मात्र रडत आहेत आहेत. सत्ता गेल्याने राहुल गांधी अस्वस्थ आहे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला.