लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आणि चित्रपट निर्माती आयेशा श्रॉफ यांची ५८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यांनी ॲलन फर्नांडिस या मुष्टियोद्ध्याविरोधात (बॉक्सर) सांताक्रूझ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आयेशा यांच्या तक्रारीनुसार, त्यांची एमएमए मॅट्रिक्स ही मिक्स मार्शल आर्ट कंपनी तसेच व्यायामशाळा असून, त्याचा मालक टायगर आहे. कंपनीचा कारभार मात्र आयेशा स्वत:च पाहतात. या कंपनीतर्फे २०१८ मध्ये सुपर लीग फाइट हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांची ओळख आरोपी ॲलन फर्नांडिस याच्याशी झाली. तो किक बॉक्सिंग असोसिएशनमध्ये फायटर म्हणून कार्यरत होता. आपल्या व्यवसायामध्ये त्याच्या ओळखीचा फायदा होईल म्हणून फर्नांडिसला आयेशा यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांच्या कंपनीत डायरेक्टर ऑफ ऑपरेशन म्हणून नियुक्त केले. तसेच सुरुवातीला ७५ हजार रुपये प्रति महिना असलेले वेतन ३ लाख रुपये करण्यात आले.
आयेशा यांच्या कंपनीने भारतात तसेच परदेशात इव्हेंट्सचे आयोजन केले. त्यासाठी गायमा कंपनीला एका स्पर्धेसाठी ७.५० लाख तर आयमाला ३.५० लाख रुपये भरावे लागतील, असे फर्नांडिसने आयेशाला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून एमएमए मॅट्रिक्स फाइट नाइट या ११ स्पर्धांचे आयोजन त्यांनी करण्यास सांगितले. ज्यात ७ स्पर्धा भारतामध्ये तर उरलेल्या ४ या भारताबाहेर होणार होत्या. भारतातील एका स्पर्धेचा खर्च साधारण ३ कोटी रुपये असल्याचे फर्नांडिस म्हणाला. त्यामुळे आयेशा यांनी त्याला वेळोवेळी ऑनलाइन चेक आणि रोख रकमेच्या स्वरूपात पैसे देत नऊ स्पर्धा घेण्यात आल्या.
असा आला संशय...
- कंपनीची दहावी स्पर्धा गेल्या वर्षी नोव्हेंबरात होणार होती. त्याचे बजेट फर्नांडिसने ८ कोटी रुपये सांगितले.- दुबईमध्ये अधिक प्रमाणात इव्हेंट होत असल्यामुळे वेंडर्स अधिक रक्कम मागत असल्याचे तो म्हणाला. तेव्हा काही रक्कम फर्नांडिसमार्फत तर काही प्रोडक्शन कंपनींना आयेशाने स्वतः दिल्याने इव्हेंटसाठी एवढी मोठी रक्कम लागत नसल्याचे त्यांना समजले. - फर्नांडिसवर त्यांना संशय आला आणि १५ एप्रिलला त्यांनी त्याला बोलवून घेत ११ इव्हेंटसाठी दिलेली, जीममध्ये क्लाइंट्सने दिलेली रक्कम व इतर खर्चाबाबत चौकशी केली. ज्यावर फर्नांडिसने उडवाउडवीची उत्तरे दिली. - क्लाइंट्सची डिसेंबर, २०१८ ते जानेवारी २०२३ पर्यंत जमा झालेली रक्कम फर्नांडिसने स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याचे तसेच दुबईमध्ये त्याने स्वतःला एमएमए मॅट्रिक्स कंपनीचा सीईओ भासवत लेटर हॉटेल, इव्हेंट स्पॉन्सर करणाऱ्या कंपनीशी पत्रव्यवहार केल्याचेही उघड झाले.